मुंबई : ‘कुलाबा – वांद्रे – सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेवरील पहिल्या टप्प्यातील आरे – बीकेसीदरम्यानच्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा मेट्रो स्थानक ते इच्छितस्थळ प्रवास सुकर करण्यासाठी मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशन (एमएमआरसी) आणि बेस्टचे प्रयत्न सुरू आहेत. त्यानुसार जेव्हीएलआर मेट्रो स्थानकावर बेस्टचे थांबे दिल्यानंतर आता बेस्टने वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक ते वांद्रे वसाहत मेट्रो स्थानकांदरम्यान वातानुकूलित बस सेवा सुरू केली आहे. मंगळवारपासून बस क्रमांक ए-३१४ ची बस सेवा सुरू झाली असून ही प्रवाशांसाठी दिलासादायक बाब ठरणार आहे.
आरे – बीकेसी भुयारी मेट्रो सेवा सुरू होऊन दोन महिने पूर्ण झाले. मात्र भुयारी मेट्रोला प्रवाशांकडून प्रतिसादच मिळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. मेट्रो स्थानकांपर्यंत पोहचण्यासाठी वा मेट्रो स्थानकांपासून इच्छितस्थळी जाण्यासाठी बेस्ट बस सेवा नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. रिक्षा-टॅक्सीचा महागडा पर्याय स्वीकारून पुढे मेट्रोने प्रवास करणे प्रवाशांना परवडणारे नाही. त्यामुळे भुयारी मेट्रोकडे प्रवासी पाठ फिरवत आहेत. ही बाब लक्षात घेऊन एमएमआरसीने मेट्रो स्थानकाबाहेर बेस्ट सेवा सुरू करणे वा बेस्ट बसचे थांबे देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. यासाठी बेस्ट प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू असून या पाठपुराव्याला यश येत आहे. काही दिवसांपूर्वीच जेव्हीएलआर मेट्रो स्थानकाबाहेर बेस्ट बस क्रमांक ३०७, ४२५, ४२८, ४१६, ५२२ सह अन्य काही बस सेवांसाठी थांबे देऊन प्रवाशांना दिलासा देण्यात आला आहे. तर आता आजपासून (मंगळवार) वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक ते वांद्रे वसाहत मेट्रो स्थानक दरम्यान वातानुकूलित बस सेवा सुरू करण्यात आली आहे.
आणिक आगारातील बेस्ट बस क्रमांक ए-३१४ वातानुकूलित बस सकाळी ७.३० ते रात्री ८ या वेळेत आठवड्याचे सातही दिवस धावणार आहे. वातानुकूलित मिडी प्रकाराची ही बस असणार असून वांद्रे पूर्व रेल्वे स्थानक, अनंत काणेकर मार्ग, भास्कर न्यायालय, सर अलियावर जंग महामार्ग, कलानगर, खान अब्दुल गफार खान मार्ग, भारत नगर जंक्शन, इंडियन ऑईल, बीकेसी कनेक्टर जंक्शन, स्वावलंबन भवन, जिओ गार्डनर, मुंबई क्रिकेट असोसिएशन, सीए इन्स्टिट्यूट, कौटील्य भवन, डायमंड मार्केट , खान अब्दुल गफार खान, हिंदुस्थान पेट्रोलियम अधिकारी वसाहत, वाल्मिकी नगर, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर नगर आणि वांद्रे वसाहत मेट्रो स्थानक असा या बसचा मार्ग असणार आहे.
© The Indian Express (P) Ltd