मुंबई : वांद्रे येथील एका महिलेच्या घरातील सामान लोणावळ्याला नेताना सामान वाहतूक सेवा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी १६ लाख रुपये किंमतीच्या दागिनन्यांवर डल्ला मारल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी वांद्रे पोलिसांनी सदर कंपनीतील चार कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
४६ वर्षीय तक्रारदार महिला योग शिक्षिका आहे. त्या वांद्रे पश्चिम येथे राहतात. यांनी ९ ऑगस्ट रोजी आपले घरगुती सामान लोणावळा येथील वडिलांकडे नेण्यासाठी सामान वाहतूक करणाऱ्या एका कंपनीशी संपर्क साधला होता. व्यवहार ठरल्यानंतर एके दिवशी कंपनीकडून पप्पू, प्रदीप कुमार, खान आणि अजय हे चार जण तक्रारदारांच्या घरी आले. या चार कर्मचाऱ्यांनी तक्रारदारांचे सामान बांधायला सुरवात केली. दरम्यान,एका कर्मचाऱ्याने या महिलेकडे घरातील जुने कपडे मागितले. तक्रारदार महिलेने त्याला घरातील जुने कपडे दिले, तसेच ते ठेवण्यसाठी एक बॅगही दिली.
प्रवासात सामानावर डल्ला
सर्व सामान बांधल्यानंतर ते टेम्पोत भरण्यात आले. तक्रारदार महिलेने मौल्यवान दागिने व महत्त्वाची कागदपत्रे एका प्रवासी बॅगेत ठेवली होती. मात्र कर्मचाऱ्यांनी त्यांना बॅग मागे ठेवण्यास सांगितली. बॅगेला कुलूप असल्याने बॅग सुरक्षित राहील, असे आश्वासन दिले. त्यामुळे तक्रारदार महिलेने ती बॅग मागे ठेवली. त्या स्वत: त्याच टेम्पोच्या केबीनमध्ये बसून लोणावळ्याला गेल्या. या टेम्पोत चालकास एकूण सात जण होते.
वांद्र्यात कर्मचारी उतरला
टेम्पो संध्याकाळी साडेपाच वाजता वांद्रे पूर्व येथील कलानगरला पोहोचला. ज्या कर्मचाऱ्याला तक्रारदार महिलेने जुन्यांची कपड्याची बॅग दिली होती तो अचाकन कलानगर येथे उतरला. तक्रारदारांनी विचारल्यानंतर इतरांनी थातूरमातूर कारण दिले आणि लगेच टेम्पो पुढे लोणावळ्याच्या दिशेने निघाला. रात्री ९ वाजता टेम्पो लोणावळ्यात पोहोचला. कर्मचाऱ्यांनी सामान उतरवले. दुसऱ्या दिवशी तक्रारदार मुंबईत आल्या.
दागिने, कागदपत्रे गायब
तक्रारदार ३ सप्टेंबर रोजी पुन्हा लोणावळ्याला गेल्या आणि त्यांनी सामान तपासले. त्यावळे त्यांना प्रवासी बॅगेचे कुलूप तुटलेले दिसले. बॅगेतील दागिने आणि महत्त्वाची कागदपत्रे गायब होती. त्यांच्या बॅगेतील १६ लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला होता. तक्रारदारांनी त्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तक्रारदाराने एका कर्मचाऱ्याला कपड्याची बॅग दिली होती. तो कर्मचारी टेम्पोतून वांद्रे येथील कलानगर परिसरात उतरला होता. या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी प्रवासादरम्यान टेम्पोत ठेवलेली बॅग उघडून त्यातील दागिने काढले आणि ते कपड्यांच्या बॅगेत ठेऊन कलानगर येथे उतरल्याचा तक्रारदार महिलेला संशय आला.
चार कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
याप्रकरणी तक्रारदाराने वांद्रे पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी पप्पू, प्रदीप कुमार, खान व अजय या चौघांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (२) (विश्वासघात ) व कलम ३ (५) (सामान्य हेतूने केलेली गुन्हेगारी कृती) अंतर्गत गुन्हा दाखल केला.