मुंबई : एसटीप्रमाणे विनावाहक(कंडक्टर) बससेवा सुरू करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. मुंबई शहरातील ४५ मार्गावर आता अशी बस धावताना दिसेल.

सध्या दक्षिण मुंबईतील इरॉस चित्रपटगृह(चर्चगट) ते नरिमन पॉईंटपर्यंत (फ्री प्रेस मार्ग)  १०० क्रमांकाच्या मार्गावर विनावाहक बेस्ट सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा लाभ मासिक पास किंवा आधीच तिकिट काढलेल्यांना मिळू शकेल. इतर प्रवाशांना मात्र या सेवेचा लाभ मिळणार नाही. याच धर्तीवर अन्य ४४ मार्गावर विना वाहक बस सेवा चालविली जाणार आहे. पुढील टप्प्यात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते गेट वे ऑफ इंडिया (१११ क्रमांक) आणि वांद्रे ते कुर्ला, वांद्रे-कुर्ला संकुल या मार्गावर विनावाहक बससेवा सुरू केली जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

राज्य परिवहन प्राधिकरणाने ऑगस्ट महिन्यात ७५ मार्गावर विनावाहक बससेवा चालविण्यास अनुमती दिल्याचे सांगण्यात येते. त्यासाठी बेस्टने ठरविलेले तिकीट दर आकारण्याची अट लागू आहे.