गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबईत येऊन ‘लालबागच्या राजाचे’ दर्शन घेतले. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘लालबागच्या राजा’च्या दर्शनाला अमित शाह दरवर्षी न चुकता येतात. सोमवारी सकाळी मुंबईत आल्यानंतर अमित शाह यांनी सर्वप्रथम प्रभादेवी येथील सिद्धिविनायक गणपतीचं दर्शन घेतलं.

सकाळी साडेअकराच्या सुमारास ते सिद्धिविनायक मंदिरात पोहोचले. अमित शाह यांच्या उपस्थितीमुळे सिद्धिविनायक मंदिर परिसरात चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. आजूबाजूच्या मुख्य रस्त्यावरील वाहतूक पूर्णतः थांबवण्यात आली होती. तसंच, मंदिर परिसरातील दुकानंही बंद ठेवण्यात आली होती.

गणेश चतुर्थीच्या पहिल्याच दिवशी लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी गणेश भक्तांची मोठी रांग लागली आहे. नवसाच्या रांगेत काल संध्याकाळपासूनच भाविक थांबले आहेत. गणेशोत्वाच्या काळात अनेक सेलिब्रिटी लालबागच्या राजाच्या दर्शनाला येत असतात.