भाजप कारशेड उभारणार
विकासाच्या नावाखाली मुंबईला उद्ध्वस्त करणारे प्रकल्प उभारू नयेत, असा इशारा देत शिवसेनेने मेट्रो प्रकल्प, दादरी-न्हावाशेवा मालवाहतूक रेल्वेमार्ग (फ्रेट कॉरिडॉर) या भाजपच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना तीव्र विरोध केला आहे. पर्यावरणाचा नाश न करता शाश्वत विकास होईल, अशा पद्धतीने प्रकल्प उभारण्याची मागणी युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
केंद्र सरकारने महत्त्वाकांक्षी मालवाहतूक रेल्वे मार्ग उभारणीची घोषणा केली, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मेट्रोचे जाळे मुंबईत उभारण्यासाठी आग्रही आहेत.
मेट्रो प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याऐवजी कांजूरमार्गऐवजी आरे कॉलनीत कारशेड उभारण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने नुकताच घेतला आहे. या कारशेडसाठी १२ हजार झाडांची कत्तल करावी लागणार आहे. तर रेल्वेमार्गासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा काही भाग जाणार आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी या दोन्ही प्रकल्पांना तीव्र विरोध केला आहे. पर्यावरणाचे नुकसान होणार नाही, अशा प्रकारे या प्रकल्पांमध्ये बदल करावेत. कोणत्याही प्रकारे पर्यावरणाचा नाश करणे आम्ही सहन करणार नाही. हा विकास आम्हाला मान्य नसून शिवसेना मुंबईकरांबरोबर राहील, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
आगामी महापालिका निवडणुका लक्षात घेता मुख्यमंत्री फडणवीस हे भाजपला श्रेय मिळावे, यासाठी मेट्रो आणि अन्य प्रकल्प तातडीने सुरू करण्यासाठी आग्रही आहेत. तर शिवसेनेने वेगवेगळ्या मुद्दय़ांद्वारे त्यामध्ये खोडा घालण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यामुळे आता शिवसेना-भाजप यांच्यात जुंपणार असून शिवसेनेच्या विरोधाला भीक न घालता प्रकल्प पुढे रेटण्याचे भाजपने ठरविले आहे.
