युतीच्या असुरक्षित नगरसेविकांच्या प्रश्नावर चर्चा घडविण्याची जोरदार मागणी करीत काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टीने पालिका सभागृह गुरुवारीही दणाणून सोडले. मात्र सभागृह नेत्यांना प्रथम हरकतीचा मुद्दा उपस्थित करण्याची संधी महापौरांनी दिल्याने विरोधकांचा भडका उडाला. आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेत महापौरांचे नाव नसल्याबद्दल सभागृह नेत्यांनी निषेध केला आणि भाजपने त्यास अनुमोदन देत सभागृह तहकूब करण्याची मागणी केली. महापौरांनी ही मागणी मान्य करीत या मुद्दय़ावर तूर्तास पळवाट काढली.
बेस्टच्या २०१४-१५ वर्षांच्या अर्थसंकल्पावरील चर्चेसाठी पालिका सभागृहाची विशेष सभा भरविण्यात आली होती. असुरक्षित नगरसेविकांच्या मुद्दय़ावरुन विरोधक गदारोळ करणार याचा अंदाज असल्याने शिवसेनेच्या गोटात धडकी भरली होती. त्यामुळे सभागृह नेत्यांनी महापौरांच्या अपमानाचा मुद्दा सुरुवातीलाच उपस्थित करून सभा तहकूब करण्याची व्यूहरचना शिवसेनेने रचली होती. सभागृह सुरू होताच काँग्रेस नगरसेविका वकारुन्निसा अन्सारी यांनी असुरक्षित नगरसेविकांच्या मुद्दय़ावर चर्चा घेण्याची मागणी केली. मात्र, सभागृह नेते यशोधर फणसे यांना महत्त्वाच्या मुद्यावर बोलायचे असल्याचे सांगत महापौरांनी त्यांना डावलले. यावर विरोधी नगरसेवकांनी घोषणाबाजी सुरू केली. या गदारोळातच फणसे यांनी  मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनलच्या उद्घाटनासाठी महापौरांना निमंत्रण नसल्याचा मुद्दा मांडला. त्यानंतर सत्ताधारी नगरसेवकांनी या मुद्यावर सभागृह तहकूब करण्याची मागणी केली. ती महापौरांनी मान्य करत कामकाज गुंडाळले.
महापौर दालनात रणकंदन
सभागृह तहकूब होताच शिवसेना आणि भाजप नगरसेवकांनी महापौर दालनात धाव घेतली. नगरसेविका आपल्या व्यथा महापौरांसमोर मांडत असताना एक नगरसेवक आपल्या मोबाइलवरून प्रसंगाचे चित्रण करीत होता. या प्रकारामुळे भाजपच्या नगरसेविका खवळल्या. महापौरांच्या देखतच संबंधित नगरसेवकाला त्यांनी जाब विचारला व या नगरसेवकाच्या अंगावर धावून गेल्या. त्याने मोबाइलमधील चित्रण काढून टाकल्यानंतरच नगरसेविका शांत झाल्या.