एकीकडे डेंग्यूच्या उद्रेकामुळे सामान्य मुंबईकर हैराण झाले असताना पालिका अधिकारी मात्र डेंग्यूची आकडेवारी लपवून सारे काही आलबेल असल्याचे चित्र उभे करण्यात दंग आहेत. डेंग्यूबाबत सर्वत्र ओरड असतानाही आरोग्य अधिकाऱ्यांनी दरवर्षीच्या योजनांनी माहिती गोलगोल फिरवून सांगण्यातच धन्यता मानल्याने अखेर आरोग्य समितीची बैठक तहकूब करण्यात आली.
डेंग्यू आजारामुळे खासगी रुग्णालयात तसेच दवाखान्यात अनेक रुग्ण येत असतानाच महापालिका मात्र केवळ त्यांच्या रुग्णालयातील रुग्णांची संख्याच प्रसिद्ध करते. वास्तविक डेंग्यू हा नोटिफाएबल आजार असल्याने खासगी रुग्णालयांकडूनही पालिकेला डेंग्यू रुग्णांची माहिती दिली जाणे अनिवार्य असते. मात्र पालिका अधिकाऱ्यांनी आरोग्य समिती सदस्यांनाही ही माहिती देण्यास नकारघंटा वाजवली. मंगळवारी झालेल्या बैठकीत सर्वच सदस्यांनी डेंग्यूच्या उद्रेकाबाबत चिंता व्यक्त केली. केईएम रुग्णालयाच्या निवासी डॉक्टरचा डेंग्यूमुळे रविवारी मृत्यू झाल्यावरही आरोग्य अधिकाऱ्यांची याबाबतीतील उदासीनता कायम आहे.
त्यातच आरोग्य विभागाची जबाबदारी असलेले अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख आणि मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी पद्मजा केसकर दोघेही कामानिमित्त मुंबईबाहेर आहेत. त्यामुळे या विषयाबाबत अधिकारवाणीने बोलण्यासही कोणी तयार नसल्याची तक्रार आरोग्य समिती सदस्यांनी केली. डॉ. सईदा खान, अजंता यादव, मनिषा पांचाळ, फाल्गुनी दवे, सुनिता यादव, डॉ. अनुराधा पेडणेकर यांनी डेंग्यूबाबतची तीव्रता स्पष्ट केल्यावरही आरोग्य अधिकाऱ्यांनी डेंग्यूची माहिती देण्यास टाळाटाळ केली.
किटकनाशक विभागावरही या समितीत ताशेरे ओढण्यात आले. किटकप्रतिबंधक उपाययोजना केली नसल्याने विकासक, बांधकाम व्यावसायिक यांच्याकडून पैसे उकळण्याचे प्रकार घडतात. मात्र किमान नागरिकांच्या आरोग्याबाबत तडजोड केली जाऊ नये, किटकनाशक फवारणी करण्यासाठी नगरसेवकांच्या फोनची वाट पाहण्याची गरज नाही, अशा शब्दात डॉ. पेडणेकर यांनी अधिकाऱ्यांवर आरोप केला.
मात्र किटकनाशक फवारणी योग्य रितीने सुरू आहे, रुग्णालयांमध्ये व्यवस्था आहे असे नेहमीचेच तुणतुणे आरोग्य अधिकाऱ्यांनी वाजवल्यावर सभा तहकूब करण्यात आली.