ई-निविदा प्रक्रियेत निविदाच येत नसल्यामुळे प्रभागांमधील कामे रखडली आहेत. त्यामुळे तूर्तास ई-निविदा पद्धत मोडीत काढून प्रभागांतील छोटी-मोठी कामे कंत्राटदारांमार्फत करण्याचे संकेत प्रशासनाने शुक्रवारी दिले. परिणामी कंत्राटदारांना पुन्हा पालिकेचे दरवाजे खुले झाले असून कंत्राटदारांची मक्तेदारी मोडून काढण्याचा निर्धार केलेल्या पालिका प्रशासनाला अखेर कंत्राटदारांनीच वठणीवर आणल्याची चर्चा पालिकेत सुरू होती.
कंत्राटदारांची पालिकेतील मक्तेदारी मोडून काढण्यासाठी प्रशासनाने ५० टक्के कामे ई-निविदेद्वारे, व उर्वरित ५० टक्के कामे कंत्राटदाराकरवी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र ई-निविदा प्रक्रियेत निविदाच सादर करण्यात येत नव्हत्या. त्यामुळे प्रभागांमधील कामे रखडली होती. निधी वाया जाण्याची भीती व्यक्त करून नगरसेवकांनी कंत्राटदारांना कामे देण्याची मागणी केली होती. प्रशासनानेही एकूण तरतुदीचा आढावा घेऊन ५० टक्के कामे कंत्राटदारांमार्फत करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. मात्र नगसेवकांच्या उर्वरित निधीच्या ५० टक्के कामे कंत्राटदारांमार्फत करण्याची, तसेच कामे करण्यापूर्वी ती साहाय्यक अभियंत्यांकडून प्रमाणित करून घ्यावीत, असे पालिकेच्या वित्त विभागातील लेखापालांनी परिपत्रकात म्हटले होते. त्यामुळे अनेक ठिकाणी कामे रखडली होती. याबाबत स्थायी समितीच्या बैठकीत सर्वच पक्षांच्या नगरसेवकांनी आक्षेप घेतला. निवडणुकांपूर्वी कामे व्हायला हवीत, असा आग्रहही नगरसेवकांनी धरला. ई-निविदा पद्धतीला बराच वेळ लागत असून भविष्यात कामे रखडण्याची भीती नगरसेवकांनी व्यक्त केली. ई-निविदा पद्धतीमध्ये सुमारे ६० टक्के कमी दराने कामे मिळविलेल्या कंत्राटदारांनी ती अद्याप सुरू केलेली नाहीत. हा निधीही वापरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी नगरसेवकांनी केली. सभागृह नेते यशोधर फणसे, विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेकर, मनोज कोटक, शुभा राऊळ, रईस शेख, धनंजय पिसाळ आदींनी सर्वच कामे कंत्राटदारांमार्फत करण्याचा आग्रह धरला. स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनीही नगरसेवक निधीतील सर्व कामे कंत्राटदारांमार्फत करण्याचे आदेश दिले.
अखेर स्थायी समितीच्या बैठकीत पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना पाचारण करण्यात आले. १०० टक्के कामे कंत्राटदारांमार्फत करण्याच्या निर्णयावर स्थायी समितीने शिक्कामोर्तब करावे. त्यानंतर बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे सीताराम कुंटे यांनी स्पष्ट केले.