जुहूपाठोपाठ ११ चौपाटय़ांच्या परिसरात रोषणाई; मार्चपर्यंत किनारे झगमगणार

मध्यरात्रीही संपूर्ण मुंबई शहर दिव्यांनी उजळून निघत असले तरी या शहराच्या पर्यटनातील महत्त्वाचा भाग असलेल्या चौपाटय़ा मात्र सूर्यास्तानंतर अंधारात बुडतात. सागरी पर्यटनापासून फटकून असलेल्या या शहराचे किनारे आता लवकरच दिव्यांनी उजळणार आहेत. गोराईपासून दादपर्यंतच्या ११ चौपाटय़ा मार्चपर्यंत दिव्यांनी उजळविण्याची पालिकेची योजना असून त्यामुळे सुरक्षिततेसोबतच पर्यटकांना संध्याकाळी उशिरापर्यंत चौपाटीची मजा लुटता येणे शक्य होईल.

जुहू चौपाटीचा दीड किलोमीटरचा परिसर बदलत्या रंगाच्या आधुनिक दिव्यांनी सजवण्यात आला आहे. २० कोटी रुपये खर्च करून करण्यात आलेल्या या सुशोभीकरणामुळे जुहू चौपाटीचा रंग पालटला आहे. शिडाच्या नौकांच्या आकाराच्या दिव्यांनी सजलेल्या चौपाटीवर वाळूमध्ये प्रकाशाद्वारे संदेश लिहिता येण्याचीही सुविधा आहे. शहराच्या पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या सर्वच चौपाटय़ांवर विद्युत रोषणाई करण्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे. गोराईपासून दादपर्यंतच्या ११ चौपाटय़ांवर दिवे लावले जाणार आहेत.

‘जुहूप्रमाणे या चौपाटय़ांवर थीमनुसार विद्युत दिवे लावले जाणार नाहीत. पर्यटनाच्या दृष्टीने आधुनिक पद्धतीचे, उत्तम रचना असलेले खांब व एलईडी दिव्यांची रचना केली जाईल. त्याचप्रमाणे पर्यटकांना चालण्यासाठी मार्ग केले जातील,’ अशी माहिती यांत्रिकी व विद्युत विभागाचे प्रमुख जयंत बनसोड यांनी दिली.

सद्य:स्थिती काय?

’ गोराई येथील चौपाटीवर याआधीच दिवे लावले गेले असून आक्सा, मनोरी, मार्वे, दानापाणी, एरंगळ, सिल्व्हर या मालाड परिसरातील किनाऱ्यांवरील विद्युत रोषणाईसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. पुढील दोन महिन्यांत याबाबतचे कार्यादेश देऊन मार्चअखेपर्यंत सर्व किनाऱ्यांवर विद्युत रोषणाई केली जाईल, असे यांत्रिकी व विद्युत विभागातील पश्चिम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

’ चिम्बई किनाऱ्यासाठी निविदा मागवण्याची प्रक्रिया सुरू आहे. माहीम येथे किल्ल्यापासून पुढील एक किलोमीटर परिसरात दिवे लावले जातील. माहीममध्ये चालण्यासाठी वेगळा मार्ग करण्याचाही प्रयत्न केला जाणार आहे.

’ दादरमध्ये इंदू मिल परिसरात एलईडी दिवे लावले जातील. या दोन्ही चौपाटय़ांवरील दिव्यांच्या रचनेबाबतचे अभिकल्प (डिझाइन) करण्याचे काम सुरू आहे. त्यानंतर निविदा मागवल्या जातील.

’ एक किलोमीटर परिसरात एलईडीचे विद्युत दिवे लावण्यासाठी साधारण ३० लाख रुपये तर दीड किलोमीटर परिसरात रोषणाईसाठी ५० ते ६० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे.