डॉकयार्ड येथील बाबू गेनू मंडई रहिवासी इमारत धोकादायक असल्याचे पालिकेला माहीत होते तर मार्चमध्ये पाच कर्मचाऱ्यांना या इमारतीत जागा का देण्यात आली, असा संतप्त सवाल येथील रहिवाशांनी केला आहे. २७ सप्टेंबर रोजी कोसळलेल्या या इमारतीमुळे ६१ जणांचा मृत्यू झाला. येथील २८ कुटुंबांपैकी पाच कुटुंबांना मार्चमध्ये या इमारतीत जागा देण्यात आल्या होत्या. मृत्यूच्या नुकसानभरपाईव्यतिरिक्त गेल्या दोन महिन्यात पालिकेकडून आपल्याला कोणताही दिलासा मिळाला नसल्याची व्यथा रहिवाशांनी मांडली.
पालिकेच्या बाजार तसेच स्वच्छता विभागातील कर्मचाऱ्यांना या इमारतीत जागा देण्यात आली होती. ही इमारत धोकादायक असून दुरुस्ती करण्यात आली नाही तर ती मोडकळीला येऊ शकते, असा अहवाल २०११ मध्ये स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये देण्यात आला होता. त्यानंतर पालिकेकडून कोणतीही मोठी दुरुस्ती हाती घेतली गेलेली नसतानाही पालिकेने मार्चमध्ये अशोक सोळंकी हे स्वच्छता कर्मचारी तसेच महादेव कांबळे, विजय जाधव, पाटणकर, संजय वाघमारे या बाजार विभागातील कर्मचाऱ्यांना मार्च २०१३ मध्ये या इमारतीत घरे दिली. पालिकेने जाणूनबुजून यांना मृत्यूच्या दरीत ढकलले, असा आरोप अशोक सोळंकी यांनी केला. पालिका दर महिन्याला पगारातून चार हजार रुपये घरभाडे म्हणून कापून घेते आणि अशा मोडकळीला आलेल्या इमारतीत राहावे लागते, असे किशोर चावडा म्हणाले.
मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईंकांना पालिकेने नुकसानभरपाई दिली. मात्र जखमी व्यक्तींवर सरकारी रुग्णालयात मोफत उपचार होत असल्याने त्यांना कोणताही खर्च मिळाला नाही. मात्र आता रुग्णालयात दर आठवडय़ाला तपासण्यासाठी जाणाऱ्या रुग्णांवर बाहेरून विकतची औषधे घेण्याची वेळ आली आहे. त्यातील काहींना दीर्घ कालावधीसाठी उपचार घ्यावे लागणार आहेत, मात्र पालिकेकडून त्याबाबत कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही, असे सुनिल कांबळे म्हणाले. त्यांचा भाऊ, वहिनी व मुलगी दुर्घटनेत मृत्यूमुखी पडल्या तर भावाच्या दोन मुलींच्या पायाला मार बसल्याने त्यांच्यावर नायर व जेजे मध्ये उपचार
सुरू आहेत.
‘या इमारतीतील रहिवाशांच्या काही समस्या असतील तर आयुक्त, अतिरिक्त आयुक्त यांच्यासोबत बैठक घेऊन सोडवल्या जातील,’ असे आश्वासन महापौर सुनिल प्रभू यांनी दिले.