पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्य़ात बॉम्बस्फोट घडवून चार जणांचे बळी घेणाऱ्या मुख्य आरोपीला ‘गुन्हे शाखा ११’च्या पथकाने मुंबईत अटक केली. १४ जून रोजी बॉम्बस्फोट करून हे सर्व आरोपी मुंबईत पळून आले होते.
कोलकात्यापासून ८० किलोमीटर अंतरावर असलेल्या सरस्वतीपारा येथील खारीगोशर चौकात १४ जून रोजी तृणमुल काँग्रेसचे काही कार्यकर्ते रिक्षातून येत होते. त्यावेळी आरोपी फारुख मुल्ला (३८) आणि त्याच्या साथीदारांनी रिक्षावर हातबॉम्ब फेकले. यावेळी झालेल्या स्फोटात चार जण ठार, तर आठ जण जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर मुल्ला आणि त्याचे साथीदार मुंबईत पळून आले होते. पश्चिम बंगाल पोलिसांनी या आरोपींच्या शोधासाठी मुंबई गुन्हे शाखा ११ च्या पथकाची मदत मागितली होती.
हे आरोपी खार येथील एका कारखान्यात काम करीत होते. आम्ही या आरोपींच्या मोबाइलाचा माग काढला आणि मुख्य आरोपी मुल्ला याला मालवणीतून शुक्रवारी अटक केली, अशी माहिती ‘गुन्हे शाखा ११’चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश सावंत यांनी दिली. मुल्लाच्या दोन साथीदारांनाही वांद्रे येथील निर्मलनगरमधून ताब्यात घेण्यात आले. त्यांना पश्चिम बंगाल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पश्चिम बंगाल पोलिसांनी मदत मागितल्यानंतर अवघ्या दीड दिवसात आरोपींना शोधण्यात यश मिळविल्याचे सावंत यांनी सांगितले. ‘गुन्हे शाखा ११’च्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद झिने, पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.