मुंबई : स्तनाच्या कर्करोगातून मुक्त झालेल्या ४० वर्षांच्या महिलेला २४व्या आठवड्यांत गर्भपात करू देण्यास उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन खंडपीठाने नुकतीच परवानगी दिली. ही महिला वैद्यकीय गर्भपात करण्याच्या प्रक्रियेसाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम आहे, असा अहवाल तज्ज्ञांच्या समितीने दिला होता. त्या आधारे न्यायालयाने या महिलेला २४व्या आठवड्यांत गर्भपात करण्याची परवानगी दिली.
याचिकाकर्ती स्तनाच्या कर्करोगातून मुक्त झाली आहे. असे असले तरी तिची वैद्यकीय स्थिती लक्षात घेता गर्भाधारणेच्या एवढ्या उशिराच्या टप्प्यात तिला गर्भपात करण्याची परवानगी देता येणे शक्य आहे की नाही? त्याचा तिच्या आरोग्यावर काही परिणाम होईल का? याच्या तपासणीसाठी न्यायमूर्ती कमल खाता आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या सुट्टीकालीन खंडपीठाने जेजे रुग्णालयाला तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, तज्ज्ञांच्या समितीने तिच्या वैद्यकीय स्थितीचा अहवाल न्यायालयात सादर केला होता.
त्यात वैद्यकीय पार्श्वभूमीमुळे याचिकाकर्ती गर्भधारणा सुरू ठेवण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार नाही. याउलट, २४व्या आठवड्यात गर्भपात करण्यासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे. त्यामुळे, तिला २४व्या आठवड्यांत गर्भपाताची परवानगी द्यावी, अशी शिफारस समितीने अहवालात केली होती. हा अहवाल ग्राह्य धरून त्याआधारे सुट्टीकालीन खंडपीठाने याचिकाकर्तीला गर्भपातास परवानगी दिली.
याचिककर्ती स्तनाच्या कर्करोगातून एप्रिल २०२१ मध्ये पूर्णपणे बरी झाली. तथापि, कर्करोगावरील उपचारामुळे तिच्या गर्भधारणेच्या क्षमतेवर परिणाम होऊ शकतो, असे तिच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी तिला सांगितले होते. दरम्यान, नियमित वैद्यकीय तपासणीच्या वेळी ती गर्भवती असल्याचे उघड झाले. गेल्या २५ एप्रिल रोजी तिची सोनोग्राफी करण्यात आली असता ती २३ आठवड्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाले.
कर्करोगाच्या उपचारांच्या पार्श्वभूमीवर तिने गर्भपात करण्यचाची इच्छा व्यक्त केली. परंतु, गर्भात कोणताही दोष नसल्याचे सांगून ३ मे रोजी तिची गर्भपाताची मागणी जेजे रुग्णालयातील वैद्यकीय समितीने फेटाळली. त्यामुळे, गर्भपाताच्या मागणीसाठी याचिकाकर्तीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
म्हणून याचिकाकर्तीकडून गर्भपाताची मागणी मानसिक त्रास, शारीरिक असुरक्षितता आणि आर्थिक अस्थिरता याचा दाखला याचिकाकर्तीने गर्भपातास परवानगी देण्याची मागणी करताना दिला होता. कर्करोग पुन्हा उद्भवू नये यासाठी नियमित वैद्यकीय तपासण्या कराव्या लागतात. त्यासाठी होणारा खर्च आणि अनियोजित गर्भधारणेचा भावनिक भार सहन होणारा नसल्याचेही याचिकाकर्तीने याचिकेत म्हटले होते. त्याचप्रमाणे, गर्भधारणा सुरू ठेवल्यास तिची वैद्यकीय पार्श्वभूमी आणि आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता याचे तिच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतील, असेही याचिकाकर्तीने याचिकेत म्हटले होते.