दिल्ली- मुंबई राजधानी एक्स्प्रेसमध्ये पर्स चोरील जाण्याबरोबरच तिकीट तपासनीस मद्यधुंद अवस्थेत सापडण्याच्या घटनेला २४ तास उलटत नाहीत तोच मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसमध्ये खुद्द मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांच्या पत्नीचीच पर्स चोरीला गेल्याचा प्रकार घडला आहे. विशेष म्हणजे ज्या डब्यातून महाव्यवस्थापकांची पत्नी प्रवास करत होती त्याच डब्यात रेल्वे सुरक्षा दलाचे विभागीय आयुक्त आपल्या ताफ्यासह प्रवास करत होते! ‘रेल्वे शर्विलकां’च्या या झटक्यामुळे रेल्वे सुरक्षा यंत्रणांच्या अब्रूचे धिंडवडे निघाले आहेत.
महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद यांची पत्नी प्रीती या मुंबईहून दिल्ली जाणाऱ्या ‘राजधानी एक्स्प्रेस’च्या ‘ए-३’ या डब्यातून प्रवास करत होत्या. राजस्थानमधील कोटा स्थानकात त्या झोपेतून उठल्या असता त्यांना त्यांच्या शेजारी असलेली पर्स आढळली नाही. पर्सची शोधाशोध केली असता ती डब्याच्या स्वच्छतागृहात सापडली. पण ती रिकामी होती. पर्समधील मोबाइल, दहा ग्रॅमच्या सोन्याच्या बांगडय़ा आणि दहा हजार रुपयांची रोख रक्कम चोरांना पळवली होती. विशेष म्हणजे पश्चिम रेल्वेच्या आरपीएफचे विभागीय मुख्य सुरक्षा आयुक्त आनंद विजय झा याच डब्यातून प्रवास करत होते. त्यांच्या काही जवानांचा ताफाही या डब्यात होता. तरीही या डब्यातून चोरटय़ांनी पर्स चोरल्याने रेल्वेवर नामुष्कीची वेळ आली आहे. या प्रकरणात नवी दिल्ली जीआरपीच्या सहायक पोलीस निरीक्षक जमुना यांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू झाला आहे. या घटनेपूर्वी गुरुवारी दिल्लीहून मुंबईत येणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसमध्ये दोन महिला प्रवाशांच्या पर्समधील सामान चोरीस गेले होते. टीसी मद्यधुंद अवस्थेत ‘भोजनयान’मध्ये सापडल्याने खळबळ उडाली होती.
संग्रहित लेख, दिनांक 9th Aug 2014 रोजी प्रकाशित
चोरांची ‘राजधानी’!
दिल्ली- मुंबई राजधानी एक्स्प्रेसमध्ये पर्स चोरील जाण्याबरोबरच तिकीट तपासनीस मद्यधुंद अवस्थेत सापडण्याच्या घटनेला २४ तास उलटत नाहीत तोच मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसमध्ये खुद्द मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांच्या पत्नीचीच पर्स चोरीला गेल्याचा प्रकार घडला आहे.
First published on: 09-08-2014 at 04:02 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Capital of thieves central railway