संघटीत गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या राजेंद्र निकाळजे उर्फ छोटा राजनविरोधातील पाच गुन्हे शुक्रवारी केंद्रीय अन्वेषण विभागाने तपासासाठी आपल्याकडे घेतले. त्यात २०००मध्ये घडलेल्या बहुचर्चित अश्रफ पटेल हत्याकांडाचा समावेश आहे.
पेशाने हिरे व्यापारी असलेल्या पटेल यांची एप्रिल २०००मध्ये आग्रीपाडा येथील त्यांच्या निवासस्थानाजवळ दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. त्यांची संघटीत गुन्हेगारीतील एका टोळीशी जवळीक असल्याची चर्चा होती. क्रिकेटवर कोटय़वधींचा सट्टा लावणाऱ्या बुकींशी त्यांचा संबंध असल्याचे बोलले जात होते. याशिवाय पटेल यांची हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलाकार आणि भारतीय क्रिकेटपटूंशी मैत्री होती. मुंबई पोलिसांनी तपास करून या प्रकरणी छोटा राजन टोळीतील चौघांना अटक केली. भारतीय क्रिकेट संघाच्या माजी कर्णधारासोबत असल्याने पटेल यांच्या हत्येचा एक प्रयत्न फसल्याचे आरोपींनी चौकशीत कबूल केले.
पटेल प्रकरणासह १९९७मध्ये बांधकाम व्यावसायिक जयप्रकाश खरे यांची दहिसर येथे झालेली हत्या आणि तीन खंडणीचे गुन्हे तपासासाठी घेतल्याचे सीबीआय प्रवक्त्याने स्पष्ट केले. हे सर्व गुन्हे राजनच्या आदेशाने त्याच्या टोळीने केल्याचा आरोप आहे. राजनला इंडोनेशीयातील बाली येथे ताब्यात घेतल्यानंतर भारतात आणण्यात आले. त्याच्याविरोधात मुंबईत नोंदविलेल्या गुन्ह्य़ांचा तपास करण्याची जबाबदारी सीबीआयकडे सोपविण्यात आली होती.