मुंबई : सायबर फसवणूकी विरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) राबवलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत तीन आरोपींना अटक केली. यावेळी तपासात आरोपींच्या बँक खात्यात पाऊणे चार कोटी रुपये जमा झाल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे त्यांना या कामासाठी मिळणारे कमिशन कूट चलनात मिळत होते. याप्रकरणी सीबीआय अधिक तपास करत आहेत.

सुधीर भास्कर पालांडे (बँक खातेधारक ), यश ठाकूर (दलाल), शौर्य सुनिलकुमार सिंग (दलाल ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून ते तिघेही सघ्या न्यायालयीन कोठडीत आहेत. याप्रकरणी मोठी टोळी कार्यरत असल्याचा संशय़ असून त्याबाबत सीबीआय अधिक तपास करत आहे.

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, २ जुलै रोजी मुंबईत आरोपींनी उघडलेल्या बँक खात्यात सायबर फसवणूकीतील तीन कोटी ८१ लाख रुपये जमा झाले होते. ती रक्कम पुढे देशभरातील शेकडो बँक खात्यांमध्ये वळविण्यात आली. त्यानंतर अनेक खात्यांद्वारे मुख्य सायबर गुन्हेगारांपर्यंत पोहोचवण्यात आली. सीबीआयच्या तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, ती बँक खाती काही बँक कर्मचाऱ्यांनी आणि दलालांनी बनावट केवायसी, कागदपत्रांच्या आधारे नियमबाह्य पद्धतीने उघडले होते. त्यासाठी आरबीआयची नियमावली व बँकांच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करण्यात आले आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदवत सीबीआयने तपास सुरु केला.

सीबीआयकडून टाकण्यात आलेल्या छाप्यांमध्ये अनेक महत्वाचे कागदपत्र, मोबाइल, आयपॅड, कागदपत्रे, व्यवहार तपशील व केवायसी कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. मुंबईतील हे बँक खाते उघडणारे मध्यस्थ, नागपूरमध्ये खातेदारांसाठी राहण्याची व्यवस्था करणारे व तिथून अन्य बँक खात्यांमध्ये पैसे वळवणारे दलाल यांची ओळख पटविण्यात सीबीआयला यश आले. त्यानुसार तिघांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, नागपूरमधील दलालांनी आणि बँक खातेधारकाने त्यांच्या कामाची कमिशन कूट चलनामध्ये स्वीकारून पुढे ती गुन्ह्यातील अन्य सहकाऱ्यांना वाटप केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी सीबीआयकडून तपास सुरु आहे.

सायबर फसवणूकीची रक्कम कूट चलन

सायबर फसवणूक केल्यानंतर आरोपी ती रक्कम कूट चलनात गुंतवत होते. ही डिजिटल रक्कम ट्रस्ट वॉलेट व एक्सोडस वॉलेटमध्ये साठवण्यात येत होती.फसवणुकीतील रक्कम ‘अंगडिया’ प्रणालीद्वारे रोख स्वरूपात भारतात आणली जात होती. तर आरोपींना कमिशन कूट चलनात मिळत होते. त्यातील काही रक्कम बनावट खात्यांमार्फत फिरवून कंपनीच्या खात्यात जमा केली जात होती. ती रक्कम कार्यालयाचे भाडे व सॉफ्टवेअर खरेदीसाठी वापरली जात होती. उर्वरित मोठा हिस्सा सोने, दागदागिने, वाहने व स्थावर मालमत्तांमध्ये गुंतवला जात होता, असा संशय आहे. याबाबत सीबीआय अधिक तपास करत आहेत.