Abhishek Ghosalkar Murder Case: शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येशी संबंधित मुंबई पोलिसांनी केलेल्या तपासात अनेक त्रुटी असल्याचे नमूद करून उच्च न्यायालयाने प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) वर्ग केला होता. त्यानंतर आता सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. व्यावसायिक मॉरिस नोरोन्हा ऊर्फ मॉरिस भाई याने त्याच्या बोरीवली येथील कार्यालयात फेसबुक लाईव्ह सुरू असतानाच अभिषेक घोसाळकर यांच्यावर ८ फेब्रुवारी रोजी गोळीबार केला होता. यानंतर मॉरिसने स्वतःवरदेखील गोळी झाडून घेतली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिषेक घोसाळकर प्रकरणात तपासात त्रुटी राहिल्याचे सांगून ६ सप्टेंबर रोजी उच्च न्यायालयाने सीबीआयकडे हे प्रकरण वर्ग केले होते. पोलिसांनी व्यवस्थित तपास केला नसून या प्रकरणाच्या खोलात जाण्याची गरज आहे. अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी घेत असताना उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला होता. मुंबई क्राइम ब्रँचने या प्रकरणाच्या सर्व कंगोऱ्याचा व्यवस्थित तपास केला नसल्याचे तेजस्वी घोसाळकर यांनी याचिकेच्या माध्यमातून सांगितले होते.

हे वाचा >> Photo : जनतेमध्ये रमणारं घोसाळकर दाम्पत्य; व्हॅलेंटाईनच्या दिवशी होता लग्नाचा वाढदिवस

उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, सीबीआयने शुक्रवारी एफआयआर दाखल केला. एका किराणा मालाच्या दुकानदाराच्या तक्रारीनंतर बोरीवली पश्चिम येथील एमएचबी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला. आयपीएस अधिकारी उपमहानिरीक्षक सायली एस. धुरत यांच्या नेतृत्वाखाली हा तपास केला जाणार आहे.

हत्येचा सर्व पैलूंनी आणि सर्वतोपरी तपास केल्याचा दावा मुंबई पोलिसांनी केला असला, तरी पुराव्यांचा विचार करता वास्तव वेगळे असल्याचे दिसून येते, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले. या हत्येशी संबंधित संशयास्पद परिस्थितीचा चक्रव्यूह भेदला गेला नाही आणि हत्येच्या महत्त्वाच्या पैलूंचा तपास केला नाही, तर ती न्यायाची फसवणूक करण्यासारखे असेल. तपासातील त्रुटींकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही, अन्यथा न्याय नाकारला जाईल. त्यामुळे, पोलिसांनी तपास न केलेल्या पैलूंचा, एकूणच प्रकरणाचा सखोल तपास करण्याची आवश्यकता आहे, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cbi takes over investigation of former shiv sena ubt corporator following bombay hc directive kvg