मध्य रेल्वेकडून ९२ यंत्रांमध्ये बदल; सहा पर्यायांऐवजी एका क्लिकवर तिकीट

मध्य रेल्वेकडून ‘एटीव्हीएम’मधील तिकीट काढण्याची प्रक्रिया आणखी सुलभ होणार आहे. या मशीनमधील तिकीट काढण्यासाठी असलेल्या सहा पर्यायांऐवजी एका क्लिकवर तिकीट मिळणार आहे. ही सुविधा २४ ऑक्टोबरपासून ४२ उपनगरीय स्थानकांतील ‘एटीव्हीएम’वर देण्यात येईल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली.

मध्य रेल्वेकडून होणाऱ्या एकूण तिकीट विक्रीपैकी ५६ टक्के तिकीट विक्री तिकीट खिडक्यांमधून, एटीव्हीएममधून २६ टक्के, जनसाधारण तिकीट बुकिंग सेवेतून १३ टक्के आणि मोबाइल यूटीएस अ‍ॅपमधून ५ टक्के विक्री होते. प्रवाशांची तिकिटांच्या रांगेतून सुटका करण्यासाठी काही वर्षांपूर्वी ‘एटीव्हीएम’ची सुविधा देण्यात आली. स्मार्ट कार्ड वापरून यातून प्रवाशांना तिकीट मिळू लागले. त्याला प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला. मात्र या ‘एटीव्हीएम’वर तिकीट मिळवण्यासाठी असलेल्या सहा पर्यायांमुळे प्रवाशांना तिकीट मिळवण्यासाठी बराच वेळ जात आहे.

या मशीनमध्ये बदल करून प्रवाशांना झटपट तिकीट देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला होता. त्यानुसार आता सहा पर्यायांऐवजी दोनच पर्याय प्रवाशांना देण्यात आले आहेत. यातील एका पर्यायासाठी मशीनवरील बटन दाबून तिकीट मिळू शकणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा तिकीट काढतानाच वेळ वाचणार असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी सांगितले.

२४ ऑक्टोबरपासून ४२ स्थानकांतील ९२ ‘एटीव्हीएम’मध्ये अशा प्रकारचे बदल केले आहेत. हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्याची संख्या वाढवण्यात येईल. ‘एटीव्हीएम’वरील एका स्क्रीनवर सिंगल आणि रिटर्न तिकिटाचा पर्याय दिला असेल. यातील एक पर्याय निवडून तिकीट मिळवू शकता. तर दुसरा पर्याय प्लॅटफॉर्म तिकिटाचा असेल.

४२ स्थानकांत नवीन सुविधा

  •  सॅण्डहर्स्ट रोड, भांडुप, ठाणे, टिटवाळा, अंबरनाथ, बदलापूर, सानपाडा, खारघर, खांदेश्वर, वाशी, बेलापूरसह ४२ स्थानकांत नवीन सुविधा उपलब्ध होईल.
  •  एटीव्हीएमवर अप व डाऊन अशा दोन मार्गाप्रमाणे एक स्क्रीन दिसेल. यात सर्व स्थानकांची यादी व तिकीट दर दिसतील. प्रवाशांनी स्मार्ट कार्ड एटीव्हीएमवर ठेवताच इच्छुक स्थानकावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर प्रवाशांना तिकीट मिळेल.