मुंबई : आरक्षित प्रवर्गांअंतर्गत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीच्या (ईडब्ल्यूएस) आरक्षणातून प्रवेश घेता येणार नाही, अशी सूचना राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने (सीईटी कक्ष) आपल्या संकेतस्थळावर जाहीर केली आहे. तसेच अशा विद्यार्थ्यांनी तक्रार निवारण कालावधीत आपल्या अर्जासोबतच्या कागदपत्रांमध्ये योग्य बदल करावे, असे आवाहनही सीईटी कक्षाने केले आहे.

सध्या अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. मात्र प्रवेश नोंदणी प्रक्रियेबरोबरच विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेताना विद्यार्थी आपल्या प्रवर्गांमधून आरक्षणासाठी अर्ज करतात. यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, व्हीजे, एनटी, इतर मागासवर्गीय, एसईबीसी, एसबीसी अशा प्रवर्गांचा समावेश आहे. त्याशिवाय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठीही आरक्षण असते.

अनेकदा आरक्षित प्रवर्गांमधून अर्ज करणारे विद्यार्थी ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र सादर करतात. अशा विद्यार्थ्यांना ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही. त्यांना त्यांच्या प्रवर्गातील आरक्षणाच्या कोट्यातूनच प्रवेश घेता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संबंधित आरक्षित प्रवर्गासाठी तक्रार निवारण कालावधीत आवश्यक कागदपत्रांसह अर्जात योग्य बदल करावे, असे सीईटी कक्षाने सूचित केले आहे. तसेच तक्रार निवारण कालावधी नसलेल्या वैद्यकीय किंवा आयुष अशा अभ्यासक्रमांसाठी त्यांच्या नोंदणी कालावधीच्या शेवटच्या तारखेपर्यंत हे बदल करता येतील, असेही जाहीर करण्यात आले आहे.