फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल, स्पीच थेरपी अभ्यासक्रमाच्या अर्ज नोंदणीला सुरुवात
मुंबई : फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच अँड लँग्वेज थेरपी, ऑडियॉलॉजी, प्रॉस्थेटिक्स अँड ऑर्थोटिक्स या विषयांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी कक्ष) जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना १६ ते २३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज नोंदणी करता येणार असून, ९ नोव्हेंबर रोजी प्रवेश परीक्षा होणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ या वर्षासाठी फिजिओथेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच अँड लँग्वेज थेरपी, ऑडियॉलॉजी, प्रॉस्थेटिक्स अँड ऑर्थोटिक्स या विषयांच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया आणि प्रवेश परीक्षा सीईटी कक्षामार्फत राबविण्यात येते. यंदा ही परीक्षा ९ नोव्हेंबर रोजी ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींनी होणार आहे. त्यासाठीची नोंदणी सीईटी कक्षाच्या www.mahacet.org या संकेतस्थळावर सुरू झाली असून २३ ऑक्टोबरपर्यंत विद्यार्थी ऑनलाइन अर्ज नोंदवू शकतात. याच काळात विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीनेच २००० रुपये शुल्क भरायचे आहे.
अर्ज नोंदवलेल्या विद्यार्थ्यांना ५ नोव्हेंबर रोजी त्यांच्या लॉग-इनमध्ये त्यांचे प्रवेशपत्र मिळेल. विद्यार्थी ते डाउनलोड करून घेऊ शकतील. तसेच ९ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते १०.३० या वेळेत विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रवेशपत्रावर दिलेल्या परीक्षा केंद्रांवर उपस्थित राहायचे आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर सकाळी १०.३० नंतर प्रवेश देण्यात येणार नाही. परीक्षा ११ ते १२.३० या वेळेत ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. राज्यातील कोणत्याही पदवी महाविद्यालयातून पदवी पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांने ३१ ऑक्टोबरपर्यंत आंतरवासिता पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे, असे सीईटी कक्षाने स्पष्ट केले आहे.