मुंबईः न्यू इंडिया को-ऑप. बँकेतील १२२ कोटी रुपयांच्या अपहाराप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने १० आरोपींविरोधात मंगळवारी आरोपपत्र दाखल केले. १२ हजार ६३४ पानांचे हे आरोपपत्र आहे. याप्रकरणी आतापर्यंत आठ आरोपींना अटक करण्यात आली असून दोन आरोपी सध्या परदेशात आहेत.
बँकेचा महाव्यवस्थापक हितेश मेहता, बांधकाम व्यावासायिक धर्मेश पौन, बँकेचा तत्कालीन सीईओ अभिमन्यू भोअन, व्यावसायिक मनोहर अरुणाचलम, कपील देढीया, उल्हानाथ अरूणाचलम, जावेद आझम, राजीव रंजन पांडे यांना याप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यांच्याविरोधात याप्रकरणी एस्प्लेनेड न्यायालय आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. याशिवाय बँकेचे माजी अध्यक्ष हिरेन भानु व त्यांची पत्नी गौरी भानु सध्या परदेशात असून त्यांच्याविरोधातही नागरी सुरक्षा संहिता कलम ३३५ अंतर्गत पोलिसांनी आरोपपत्र दाखल केले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी ५५ पंचनामे केले आहेत तर ४५ साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. त्यातील आठ साक्षीदारांची भारतीय नागरी सुरक्षा कायदा कलम १८३ अंतर्गत साक्ष नोंदवण्यात आली आहे. याप्रकरणी १६८ कोटी रुपयांच्या २१ मालमत्तांवर टाच आणण्यात आली आहे. त्यात पाच आरोपींच्या मालकीच्या या मालमत्ता महाराष्ट्र, गुजरात आणि बिहार राज्यांमध्ये आहेत. त्यात आरोपी हितेश मेहता व त्याचे कुटुंबीय यांची नावे सात सदनिका, एक दुकान व एक बंगला (एकूण किंमत १२ कोटी) यांचा समवेश आहे. याशिवाय आरोपी अरुणाचलम याच्या नावे एक दुकान (किंमत दीड कोटी), आरोपी कपिल देडीया याच्या नावावर असलेली ७५ लाखांची सदनिका, आरोपी जावेद आझम याच्या शोरूममधून जप्त केलेल्या ५५ लाखांच्या विद्युत वस्तू, मधुबनी येथील दुकान (किंमत ५५ लाख), पटना येथील सदनिका(किंमत ५० लाख) अशा एकूण दीड कोटींच्या मालमत्ता तसेच बिहारमधील १० दुकानांसाठी दिलेले अडीच कोटी रुपयांचे भाडे, याशिवाय आरोपी धर्मेश यांचा सुमारे ४० हजार चौरस फूट क्षेत्रफळाचा झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प (किंमत १५० कोटी) या मालमत्तांचा समावेश आहे. याप्रकरणात अजयसिंह राठोड, पवन जैस्वाल, शौकत जमादारसह पाच आरोपींना याप्रकरणात आरोपी करण्यात आले आहे.
बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी देवर्षी घोष यांच्या तक्रारीवरून दादर पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (५), ६१ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यात १२२ कोटी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी बँकेचा महाव्यवस्थापक हितेश मेहता याला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. त्यानंतर इतर आरोपींची माहिती पोलिसांना मिळाली होती. याशिवाय याप्रकरणातील आणखी आरोपी हिरेन भानू, गौरी भानू सध्या परदेशात असल्याची माहिती आहे. त्यांच्याविरोधात पोलिसांनी लुकआऊट नोटीस काढली आहे.