मुंबई : अहिल्यानगर जिल्ह्यातील शनि शिंगणापूर देवस्थानमधील विश्वस्तांनी मोठ्याप्रमाणात आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहार केल्याचे धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या चौकशीतून समोर आले असून या घोटाळयातील जबाबदार विश्वस्तांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच जे विश्वस्त लोकसेवकांच्या व्याख्येत येतात, त्यांच्या संपत्तीचीही चौकशी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केली.

विठ्ठल लंघे, सुरेश धस आदींनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून शनि शिंगणापूर देवस्थानमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला होता. शनि शिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्तांनी चक्क देवालाही सोडले नाही. सर्वच कामात प्रंचड घोटाळा केला आहे. या देवस्थानमध्ये बनावट ॲप आणि पावत्यांद्वारे देणगी वसूल करून तसेच हजारो बनावट कर्मचाऱ्यांची नोंद करून कोटयावधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचे चौकशी अहवालातून स्पष्ट झाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

अप्पर पोलीस महासंचालकाच्या देखरेखीखाली तपास

या घोटाळ्याची सरकारने गंभीर दखल घेतली असून सायबर विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकाच्या देखरेखीखाली पोलिसांकडून याचा स्वतंत्र तपास सुरू करण्यात आला आहे. तर मंदिर व्यवस्थापनाशी संबधित अधिकारी आणि विश्वस्तांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले असून याचा तपासही बाहेरचे अधिकारी करतील.

तसेच जे विश्वस्त लोकसेवकांच्या व्याख्येत येतात, त्यांच्या संपत्तीची चौकशी केली जाईल असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे विश्वस्तमंडळ बरखास्त करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच मंदिरांवर शिर्डी, पंढरपूर प्रमाणे सरकारचा कारभार सुरू होईल असेही फडणवीस यांनी सांगितले.