मुंबईः माहीम परिसरात बुधवारी पहाटे प्लास्टिकच्या पिशवीत दोन वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडल्यामुळे खळबळ उडाली. त्यानंतर तात्काळ पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. याप्रकरणी शाहू नगर पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
शीव-माहीम लिंक रोड येथे प्लास्टिकच्या पिशवीत लहान मुलाचा मृतदेह सापडल्याचा दूरध्वनी मुंबई पोलिसांंच्या मुख्य नियंत्रण कक्षाला बुधवारी पहाटे पाचच्या सुमारास आला. त्यानुसार स्थानिक पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. त्यानंतर तात्काळ पोलीस पथक घटनास्थळी रवाना झाले. पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता प्लास्टिकच्या पिशवीत लहान मुलगा असल्याचे निदर्शनास आले. त्याच्या तोंडातून फेस येत होता. तसेच त्याचे डोके व उजवे मनगट उंदरांनी कुरतडले होते.
हेही वाचा – निधीवाटपावरील स्थगिती कायम, उपनगरातील स्थानिक विकासकामांसाठी मदत
पोलिसांनी तात्काळ त्या मुलाला शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून मुलाचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. मुलाची ओळख पटली असून तो दोन वर्षांचा आहे. याप्रकरणी शाहू नगर पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.