राज्यात सरकार बदलले तरी शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. केंद्राकडूनही मदत देण्यात टाळाटाळ सुरू आहे. अशा परिस्थितीत जुन्या आणि नवीन सरकारमध्ये फरक काय, असा सवाल करीत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांनी दुष्काळाच्या मुद्दय़ावरून पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. तर अधिकाऱ्यांच्या ‘उसनवारी’वरून महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनीही पुन्हा आपली नाराजी व्यक्त
 केली.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्शिवसेनेच्या मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि केंद्राकडून मदत देण्यात होत असलेली चालढकल यावरून दिवाकर रावते, रामदास कदम आदी मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली.  केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून वारंवार त्रुटी काढण्याचेच काम सुरू आहे. त्याची पूर्तता केल्यानंतरही अजून मदत मिळालेली नसल्याचे सांगत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शिवसेनेच्या भूमिकेला पुष्टी जोडल्याचे समजते.
त्यावर केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असून आठवडाभरात मदतीचे पैसे येतील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. त्याचप्रमाणे यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्य़ात शेतकऱ्यांच्या आत्महत्या का होतात याचे प्रायोगिक तत्त्वावर सर्वेक्षण सुरू असून त्याचा अहवाल आल्यानंतर मराठवाडा आणि विदर्भातही सर्वेक्षण केले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याचे समजते.