महाराष्ट्र सदनातील अनेक कामे अपूर्ण आणि त्रुटीपूर्ण असून, ही कामे पूर्ण करून घेण्यासाठी निवासी आयुक्त बिपिन मलिक आणि संबंधित कंत्राटारांमध्ये बोलणी सुरू असल्याचे सांगत, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी छगन भुजबळांवर पलटवार केला.  सदनातील गैरसोयींसाठी निवासी आयुक्त जबाबदार असल्याच्या टीकेने गेल्या काही दिवसांत जोर धरला आहे. यासंदर्भात आपण निवासी आयुक्त किंवा कंत्राटदार यांच्यापैकी कोणा एकाची बाजू घेऊ शकत नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मात्र, महाराष्ट्र सदनातील अपूर्ण कामे तातडीने पूर्ण होण्याची गरज व्यक्त करत त्यांनी देखभालीची जबाबदारी असणाऱ्या चमणकर एंटरप्रायजेस आणि पर्यायाने छगन भुजबळ यांच्यावर टीका केली.
दरम्यान, छगन भुजबळ यांनी शनिवारी सकाळी महाराष्ट्र सदनातील अपुऱ्या सुविधांकडे निवासी आयुक्तांनी केलेल्या दुर्लक्षामुळेच शिवसेनेच्या खासदारांच्या संतापाचा कडेलोट झाल्याचे सांगितले. महाराष्ट्र सदनातला प्रकार हा निंदनीय असून तो चिघळवण्यासाठी निवासी आयुक्त बिपीन मलिक जबाबदार असल्याचे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. छगन भुजबळांच्या मर्जीतील चमणकर एंटरप्रायजेस प्रा.लि. यांच्याकडे दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या पुर्नबांधणीचे आणि देखभालीचे कंत्राट सोपवण्यात आले होते. मात्र, निवासी आयुक्तांच्या दादागिरीमुळे यापुढे सदनातील दोष व त्रुटी दूर करण्याची जबाबदारी आमची नाही, अशी भूमिका विकासकाने घेतली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm prithviraj chavan slams chhagan bhujbal