‘म्हाडा’ची २०१४ घरांची सोडत आता १५ जून रोजी होणार आहे. मुंबईतील ८१४ तर विरार आणि वेंगुर्ला येथील एकूण १८२७ अशा २६४१ घरांचा त्यात समावेश आहे. या घरांसाठी ऑनलाइन अर्जासाठी नोंदणी प्रक्रिया २८ एप्रिल रोजी सुरू होत असून सहा मे पासून ऑनलाइन अर्ज दाखल करता येतील.
मुंबईतील ८१४ घरांमध्ये उच्च उत्पन्न गटातील २४५ घरांचा, मध्यम उत्पन्न गटातील ६५ घरांचा, विनोबा भावे नगर कुर्ला येथील २०७ घरांचा तर अत्यल्प उत्पन्न गटातील २९७ घरांचा समावेश आहे. अत्यल्प उत्पन्न गटातील घरांची किंमत १६ लाख २६ हजार ५०० पासून सुरू होते. तर दहिसर येथील उच्च उत्पन्न गटातील घरांची किंमत तब्बल ८० लाख ९८ हजार ५०० रुपये आहे.
कोकण मंडळाने विरार येथील १७१६ घरांची आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला येथील १११ घरांची जाहिरात काढली आहे. विरार येथे १११६ घरे अल्प उत्पन्न गटातील आहेत. तर ६०० घरे मध्यम उत्पन्न गटातील आहेत. वेंगुल्र्यात ४० घरे अल्प उत्पन्न गटातील, ५९ घरे मध्यम उत्पन्न गटातील तर १२ घरे उच्च उत्पन्न गटातील आहेत. कोकण मंडळातर्फे काढण्यात आलेल्या घरांची किंमत ११ लाख ८५ हजारांपासून ते ५० लाख २१ हजार ६१४ रुपयांपर्यंत आहे.
या घरांचा आकार, त्यासाठीचे आरक्षण, किंमत व अनामत रकमेचा तपशील ‘म्हाडा’च्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. ऑनलाइन अर्जासाठी नोंदणी प्रक्रिया २८ एप्रिलपासून सुरू होत आहे. त्यानंतर ६ मे रोजी ऑनलाइन अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल. ३० मे पर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करता येतील. अर्ज दाखल केल्यानंतर अनामत रक्कम भरण्याची मुदत २ जूनपर्यंत आहे.