मुंबई : मध्य प्रदेश व राजस्थानमध्ये कोल्ड्रिफ या खोकल्याच्या औषधामध्ये असलेल्या डायथिलीन ग्लायकोल या विषारी घटकामुळे बालकांचा मृत्यू झाला. त्यानंतर मध्य प्रदेशमधील अन्न व औषध प्रशासनाने राबविलेल्या मोहिमेनंतर आणखी दोन खोकल्यांच्या औषधांमध्ये डायथिलीन ग्लायकोल हा विषारी घटक सापडल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासनाने औषध विक्रेत्यांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत.
मध्य प्रदेशमध्ये कोल्ड्रिफ या खोकल्याच्या औषधामुळे झालेल्या बालकांच्या मृत्यूमुळे महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनसुद्धा सतर्क झाली आहे. मध्य प्रदेशने आणखी दाेन खोकल्यांच्या औषधांमध्ये डायथिलीन ग्लायकोल हा विषारी घटक सापडला असल्याचे जाहीर केले. रेस्पिफ्रेश टीआर आणि रिलाइफ या औषधांचा समावेश आहे. ही दोन्ही औषधे गुजरातमधील कंपन्यांची आहेत. राज्यातील संबंधित परवानाधारकांना त्यांच्या अधिकारक्षेत्रातील संबंधित सहायक आयुक्त जिल्हा कार्यालयाला कोणत्याही साठ्याची किंवा पुरवठ्याची माहिती त्वरित कळविण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक दा. रा. गहाणे यांनी दिली.
घातक परिणाम
डायथिलीन ग्लायकोल (डीईजी) हे एक विषारी रसायन आहे. हे रसायन खोकल्याच्या औषधामध्ये असल्याचे त्याचे गंभीर परिणाम होतात. याच्या सेवनाने विषबाधा, मूत्रपिंड निकामी होणे, मेंदूविकाराने मृत्यूदेखील होऊ शकतो, विशेषतः लहान मुलांमध्ये या समस्या अधिक वेगाने निर्माण होतात.