अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण होत असल्याची सबब पुढे करून माहितीच्या अधिकाराअंतर्गत माहिती मिळवून प्रशासनाकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदारांची के-पूर्व विभाग कार्यालयाने गळचेपी सुरू केली आहे. सहाय्यक आयुक्तांनी के-पूर्व विभाग कार्यालयात प्रवेश मनाई केल्यामुळे संतप्त झालेल्या २० तक्रारदारांनी सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
पुनर्विकास प्रकल्पात होणारी फसवणूक, अनधिकृत बांधकामे, अपुरा पाणीपुरवठा, कचऱ्याचे ढिग, तुंबलेली गटारे, आरोग्याचे प्रश्न, तसेच रेंगाळलेली छोटी-मोठी नागरी कामे याबाबत माहितीच्या अधिकाराचा वापर करून माहिती मिळवून प्रशासनाकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदारांमुळे के-पूर्व विभाग कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले होते. अखेर के-पूर्व विभाग कार्यालयातील सहाय्यक आयुक्त भाग्यश्री कापसे यांनी परिपत्रक जारी करून इमारत व कारखाने खाते आणि अन्य विभागांमध्ये व्यावसायिक तक्रारदारांना प्रवेश देऊ नये, असे आदेश सहाय्यक सुरक्षा अधिकाऱ्यांना २३ ऑगस्ट २०१३ रोजी दिले. व्यावसायिक तक्रारदारांनी आपल्या तक्रारी टपालामार्फत पाठवाव्यात. तक्रारींचे निवारण न झाल्यास सोमवार, शुक्रवारी दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत के-पूर्व विभाग कार्यालयातील सहाय्यक आयुक्तांना भेटावे, असेही या परिपत्रकात म्हटले आहे. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी या तक्रारदारांना या कार्यालयात प्रवेश मनाई केली.
पालिका कार्यालयात प्रवेश नाकारणाऱ्या कापसे यांचा निषेध करीत २० तक्रारदार सोमवारपासून के-पूर्व विभाग कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषणाला बसले आहेत. बिल्डर, दलाल यांचा के-पूर्व विभाग कार्यालयात मुक्त संचार असतो. मात्र नागरी सुविधांमधील दोष तक्रारींच्या माध्यमातून दाखवून देणाऱ्यांना कार्यालयात प्रवेश नाकारण्यात येत आहे. तात्काळ हे परिपत्रक मागे घ्यावे आणि तक्रारदारांना कार्यालयात प्रवेश द्यावा, अशी मागणी या तक्रारदारांनी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांना पत्र पाठवून केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 4th Feb 2014 रोजी प्रकाशित
तक्रारदारांचे उपोषण
अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा निर्माण होत असल्याची सबब पुढे करून माहितीच्या अधिकाराअंतर्गत माहिती मिळवून प्रशासनाकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदारांची के-पूर्व विभाग कार्यालयाने गळचेपी सुरू केली आहे.
First published on: 04-02-2014 at 02:00 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Complainant hunger strike against entry prohibition in bmc office