मुंबई : करोनाचा प्रभाव जसा वाढू लागला आहे तसतसे चाचण्यांबाबतचे धोरण शिथिल केले जात आहे. त्यामुळे बाधितांचा करोनामुक्तांचा आकडा वाढत असला तरी सामान्यांमध्ये संभ्रम आणि गोंधळाचे वातावरण आहे.

करोनाबाधित रुग्णाला घरी पाठवण्याबाबत सुरुवातीचे धोरण स्पष्ट होते. रुग्णांचा छातीचा रेडिओग्राफ आणि सलग दोन करोना चाचण्या अ-बाधित (निगेटिव्ह) हे नियम पाळले जात होते. तसेच, ज्या व्यक्तींची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, अशा रुग्णांच्या निकटच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचे तात्काळ विलगीकरण केले जाई. पूर्वी अशा लोकांच्या तत्काळ चाचण्या केल्या जात होत्या.

एप्रिलच्या मध्यात यात केंद्राच्या धोरणाला अनुसरून बदल करण्यात आले. आता फक्त करोनाची लक्षणे असल्यासच चाचणी केली जाते. ज्यांच्यामध्ये लक्षणे दिसत नाहीत, त्याचे नमुने चाचणीसाठी गोळा करण्यात येत नाहीत. त्यांना केवळ विलगीकरणाचा सल्ला दिला जातो.

धोरण का बदलले?

परदेशात अनेक ठिकाणी रुग्णांना घरी पाठवण्याबाबत धोरणात बदल करण्यात आले आहेत. सुरुवातीला चाचण्यासापेक्ष ठरवले जात होते, त्यानंतर लक्षणेसापेक्ष आणि मग कालावधीसापेक्ष अशा पद्धतीने रुग्णांना घरी सोडण्याबाबतचा निर्णय घेण्यात येत आहे. आतापर्यंतच्या रुग्णांच्या अहवालावरून असे निष्कर्ष निघाले आहेत की, दहा दिवसांनी रुग्णांचे अहवाल अबाधित येतात. त्याला अनुसरून केंद्राच्या निर्देशांनुसार चाचणीचे नियम बदलण्यात आले.

वृद्ध, डायलिसिस, गरोदर महिलांच्या चाचणीबाबत नियम स्पष्ट

* नियमाप्रमाणे ज्या लोकांना करोनाची लक्षणे म्हणजेच ताप आणि खोकला जाणवतात, ६० वर्षांवरील आणि जे करोनाचा संसर्ग झालेल्यांच्या संपर्कात आले आहेत त्यांची चाचणी होईल.

* डायलिसिससाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णाकडे करोना चाचणीची मागणी करू नये, अशा सूचना पालिका प्रशासनाने खासगी डायलिसिस केंद्रांना दिल्या आहेत. ज्या रुग्णांमध्ये करोनाची लक्षणे असतील किंवा ज्यांच्या घरात करोनाचा रुग्ण असेल अशाच रुग्णांना चाचणी करण्याच्या सूचना द्याव्यात, असे प्रशासनाने कळवले आहे. अर्थात हे निकष धुडकावून काही केंद्रांवर चाचणी सक्तीची के ली जात आहे.

* याशिवाय ३४ आठवडय़ांची गरोदर महिला, आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी यांचा रुग्णांशी संपर्क आला असल्यास आणि त्यांच्या लक्षणे दिसत नसल्यास त्यांचीही चाचणी करण्यात येत आहे.