राष्ट्रवादीप्रमाणेच काँग्रेसकडूनही मंत्र्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविले जाईल, अशी शक्यता आहे. चंद्रपूर मतदारसंघासाठी सांस्कृतिकमंत्री संजय देवतळे यांच्या नावाची शिफारस छाननी समितीने रविवारी केली. तसेच राष्ट्रवादीला किती जागा सोडायच्या आणि कोणत्या जागांची आदलाबदल करायची यावरही खल करण्यात आला.
उमेदवारांची नावे निश्चित करण्याकरिता रेल्वेमंत्री मल्लिाकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली छाननी समिती नियुक्त केली आहे. या समितीची पहिली बैठक नवी दिल्लीत खरगे यांच्या निवासस्थानी पार पडली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे व समितीचे सदस्य परेश धनानी हे उपस्थित होते. पक्षाचे सध्या १७ खासदार असले तरी चार ते पाच जणांना पुन्हा उमेदवारी दिली जाणार नाही. सुरेश कलमाडी यांना पक्षाने निलंबित केले आहे. जयवंत आवळे, भास्करराव खतगावकर, सुरेश टावरे यांना पुन्हा उमेदवारी मिळणे कठीण मानले जाते. दत्ता मेघे यांनी आपल्या मुलाला उमेदवारी देण्याची मागणी केली आहे. संसदेचे ५ तारखेपासून अधिवेशन सुरू होत असल्याने विद्यमान खासदारांच्या मतदारसंघांबाबत अधिवेशन संपल्यावरच निर्णय घेतला जाणार आहे.
पक्षाचे गेल्या वेळी २६ पैकी १७ निवडून आले तर नऊ ठिकाणी पराभव झाला होता. पहिल्या फेरीत पराभूत मतदारसंघांतील उमेदवारांच्या नावांबाबत चर्चा करण्यात आली. प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी अकोला तर हितेंद्र ठाकूर यांच्या आघाडीकरिता पालघरची जागा सोडण्याची काँग्रेसची तयारी आहे. या दोन मतदारसंघांचा आढावा घेण्यात आलेला नाही. औरंगाबाद आणि यवतमाळ-वाशिममध्ये राहुल गांधी यांच्या कल्पनेनुसार कार्यकर्त्यांमधून उमेदवाराची निवड केली जाणार आहे. शिर्डी, जालना, रायगड, चंद्रपूर आणि धुळे या मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. चंद्रपूरमधून मंत्री संजय देवतळे यांचे नाव पॅनलमध्ये ठेवण्यात आले आहे.
राष्ट्रवादीला किती जागा सोडणार?
आघाडीत राष्ट्रवादीने गेल्या वेळएवढेच २६-२२ हे संख्याबळ कायम असावे, असा आग्रह धरला आहे. या पाश्र्वभूमीवर नक्की किती जागा सोडायच्या याबाबत संरक्षणमंत्री ए. के. अ‍ॅन्टोनी यांच्याकडे रात्री मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. रायगडची जागा सोडण्याची काँग्रेसची तयारी आहे. या बदल्यात रावेरची जागा देण्याची राष्ट्रवादीची तयारी आहे. रावेर की अन्य कोणत्या मतदारसंघावर दावा करावा यावर चर्चा करण्यात आली.