मुंबई : न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील १२२ कोटी रुपयांच्या अपहाराप्रकरणी बांधकाम व्यावसायिक धर्मेश जयंतीलाल पौन (५८) याला आर्थिक गुन्हे शाखेने रविवारी अटक केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी महाव्यवस्थापक हितेश मेहता याच्यामार्फत गैरव्यवहारातील ७० कोटी रुपये बांधकाम व्यावसायिक पौनला मिळाल्याचा आरोप आहे. आरोपी पौनने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अधिकाऱ्यांकडे कबुली दिली होती. दोन्ही आरोपींना याप्रकरणी रविवारी न्यायालयापुढे हजर केले असता त्यांना २१ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याप्रकरणी तिसऱ्या आरोपीची ओळख पटली असून त्याच्या सहभागाबाबत तपास सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

१२२ कोटी रुपयांच्या अपहाराप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने बँकेचे महाव्यवस्थापक हितेश मेहता (५७) याला शनिवारी अटक करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे बांधकाम व्यावसायिक धर्मेश पौन याला शनिवारी रात्री आर्थिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. त्यानंतर रविवारी त्याला याप्रकरणी अटक करण्यात आली. पौन हा कांदिवली पश्चिम येथील श्रीजी शरण या इमारतीतील रहिवासी आहे.

२०१९ पासून अपहार

या संपूर्ण प्रकरणात प्रभादेवी व गोरेगाव येथील शाखेतील तिजोरीत ठेवलेल्या १२२ कोटी रुपयांच्या रकमेचा अपहार केला आहे. त्यात बँकेतील इतर कर्मचाऱ्यांनी मदत केली होती का? याबाबत पोलीस तपास करत आहेत.

प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी देवर्षी घोष यांनी केलेल्या तक्रारीवरून शनिवारी पहाटे दादर पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१६ (५), ६१ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला. हितेश मेहताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीने व त्याच्या साथीदारांनी फौजदारी कट रचून त्याच्या ताब्यात देण्यात आलेल्या प्रभादेवी व गोरेगाव शाखेतील तिजोरीमधील १२२ कोटी रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. बँकेच्या महाव्यवस्थापकासह तिघांना याप्रकरणी आरोपी करण्यात आले आहे. याप्रकरणी इतर आरोपींचाही सहभाग असल्याचा संशय आहे. २०१९ पासून हा अपहार सुरू असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार करण्यात आली होती. तक्रार अर्जावरून दादर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तो पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. आर्थिक गुन्हे शाखा याप्रकरणी तपास करत आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Construction businessman arrested new india cooperative bank embezzlement case mumbai print news ssb