‘म्हाडा’च्या कोकण मंडळामार्फत विरारमधील बोळींज येथे उभारण्यात येत असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पासमोर आता वसई-विरार महानगरपालिकेने नवी अडचण उभी केली आहे. या प्रकल्पाच्या भूखंडावरील एका जागेवर थेट स्मशानभूमीचे आरक्षण लागू करण्यात आले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठीची ५६० घरे कमी होणार असून ऐन गृहप्रकल्पात स्मशानभूमी बांधली गेल्यास प्रकल्पातील घरांच्या विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. ‘म्हाडा’ने यास तीव्र हरकत घेतली आहे. मुळात इतरत्र मोकळी जागा उपलब्ध असताना स्मशानभूमी या प्रकल्पाच्या जागेवरच का, असा सवाल त्यांनी केला.
विरार-बोळींज येथे ‘म्हाडा’कडे ४७ हेक्टर जागा आहे. पैकी २२ हेक्टर जमिनीवर वसई-विरार महानगरपालिकेच्या विकास आराखडय़ातील विविध आरक्षणे टाकण्यात आली आहे. ती ‘म्हाडा’ने नाईलाजाने मान्य केली. त्यानंतर पुन्हा तीन हेक्टर जमीन गृहप्रकल्पाच्या आराखडय़ातून वगळण्यात आली. त्यामुळे दोन टप्प्यांतील गृहप्रकल्पासाठी अवघी १४ हेक्टर जमीन उरली आहे. त्यावर २२ ते २४ मजल्यांच्या ६८ इमारती बांधून सर्वसामान्यांसाठी नऊ हजार घरे बांधण्याचे नियोजन ‘म्हाडा’च्या कोकण मंडळाने केले आहे.
आता पुन्हा महानगरपालिकेने गृहप्रकल्पाच्या जागेवर ६३२७ चौरस मीटर जागा स्मशानभूमीसाठी आरक्षित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. विशेष म्हणजे आधी या स्मशानभूमीसाठी १३७/ए या सव्र्हे क्रमांकावर आरक्षण होते. ते बदलून ‘म्हाडा’च्या प्रकल्पातील जागेवर स्मशानभूमी बांधण्याचा घाट महानगरपालिकेने घातला आहे. हे आरक्षण मंजूर झाल्यास घरांसाठीची जागा कमी होऊन सर्वसामान्यांसाठीची ५६० घरे रद्द होतील.
‘म्हाडा’चा तीव्र आक्षेप
‘म्हाडा’च्या कोकण मंडळाचे मुख्याधिकारी भाऊसाहेब दांगडे यांनी गृहप्रकल्पाच्या जमिनीवर स्मशानभूमीच्या आरक्षणाला तीव्र हरकत घेणारे आणि स्मशानभूमीच्या मूळ जागेतील आरक्षण हलवण्याबाबत नाराजी व्यक्त करणारे पत्र वसई-विरार महानगरपालिकेच्या आयुक्तांना पाठवले आहे. आजूबाजूला अनेक मोकळय़ा जागा उपलब्ध असताना ‘म्हाडा’च्या गृहप्रकल्पाच्या जागेवर स्मशानभूमीचे आरक्षण कशासाठी असा सवाल
त्यांनी केला आहे.