एका प्रख्यात सुरक्षा रक्षक कंपनीच्या अधिकाऱ्यावर तब्बल ३२ वर्षांनंतर वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. एका हवाई सुंदरीने दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार महिला हवाई सुंदरी आहे. १९८२ साली तिची विमानात या अधिकाऱ्यासोबत ओळख झाली होती. त्यानंतर त्यांची मैत्री झाली होती. या दोघांचे प्रेमसंबध होते. या अधिकाऱ्याने लग्नाचे आमिष दिले होते. त्यानंतर तीन वर्षे हे दोघे एकत्र राहात होते. परंतु लग्न केले नव्हते. मात्र काही वर्षांनंतर या अधिकाऱ्याचे यापूर्वीच लग्न झाले असून त्यांना तीन मुले आहेत, असे लक्षात आल्यानंतर तिने वाकोला पोलीस ठाण्यात या अधिकाऱ्याच्या विरोधात तक्रार केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

घरकाम करणारी महिला खंडणीखोर
मुंबई : घरकाम करणाऱ्या एका महिलेला मालकाकडे खंडणी मागितल्याप्रकरणी डीएन नगर पोलिसांनी अटक केली आहे. तंत्रा घोष (३९) असे या महिलेचे नाव आहे.  काही महिन्यांपूर्वी तंत्रा अंधेरीतील एका घरात घरकाम करत होती. या घराचा मालक प्रख्यात पेट्रोलियम कंपनीत उपमहाव्यवस्थापक पदावर कार्यरत आहे. तेथे दोन महिने काम केल्यानंतर तिने तिकडची नोकरी सोडली. त्यानंतर मात्र ती या मालकाला खंडणीसाठी धमकावू लागली.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर अपघातात दोन ठार
मुंबई  : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गाडीचा टायर फुटून झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या गाडीत नेरूळ येथे राहणारे हरिश्चंद्र दरेकर (४६), वामन दरेकर (४२) आणि सविता दरेकर हे तिघे प्रवास करत होते. सकाळी सव्वाआठच्या सुमारास त्यांची गाडी ओझर्डे गावाजवळ असताना गाडीचा पुढील एक टायर घर्षणामुळे फुटला. त्यामुळे त्यांची गाडी उलटली. या अपघातात हरिश्चंद्र आणि वामन हे दोघेही ठार झाले, तर सविता दरेकर गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

वातानुकूलित शवपेटीची मागणी
मुंबई  : आपत्कालीन स्थितीत मृतदेह टिकवण्यासाठी मुंबईकरांना खासगी रुग्णालयांकडे धावाधाव करावी लागते. महानगरपालिकेने याबाबत पुढाकार घेऊन वातानुकूलित शवपेटी देण्याची सेवा अल्पदरात सुरू करावी, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांनी मंगळवारी पालिका सभागृहात केली. परराज्यात किंवा परदेशी असणारे जवळचे नातेवाईक येईपर्यंत अनेकदा मृतदेहाचे जतन करावे लागते. खासगी रुग्णालयात या सेवेसाठी १२ ते १५ हजार रुपयांचा खर्च येतो.  त्याऐवजी पालिकेने स्थानिक रुग्णालयात ही सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी ठरावाची सूचना विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी मांडली.

एकलव्य अभ्यासिकेत पाच विद्यार्थी भाजले
मुंबई : घाटकोपर येथील एकलव्य अभ्यासिकेला वर्गाऐवजी प्रयोगशाळेत जागा देण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रकाशासाठी तेथील रसायनांनी भरलेला दिवा पेटवला. या दिव्याचा स्फोट होऊन पाच विद्यार्थी जखमी झाले. या प्रकरणातून पालिकेचा बेजबाबदारपणा उघड झाला आहे. घाटकोपरच्या रमाबाई नगरमधील विद्यार्थी सोमवारी संध्याकाळी साडेसहा वाजता या अभ्यासिकेत गेले असता त्यांना वर्ग उघडून देण्याऐवजी प्रयोगशाळेत बसण्यास सांगण्यात आले. प्रयोगशाळेत वीज नसल्याने विद्यार्थ्यांनी तेथील दिवा पेटवण्याचा प्रयत्न केला. या दिव्याचा स्फोट होऊन इतर रसायनांनीही पेट घेतला. त्यात प्रथमेश खिलारे, संदीप यादव, विशाल सूर्यवंशी, प्रफुल्ल भोजने, रोशन मलिक हे सातवीतील विद्यार्थी जखमी झाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime news brief