मुंबई : प्रचंड आर्थिक चणचण असल्याने बोरिवलीमधील एका इसमाने आपले मूत्रपिंड विकण्याचा निर्णय घेतला. मूत्रपिंड विकत घेणाऱ्याचा ऑनलाईन शोध घेत असताना सायबर भामट्याने त्याला सापळ्यात ओढले. एका मूत्रपिंडाच्या मोबदल्यात १ कोटी रुपये देण्याचे आमिष दाखवले आणि उलट त्याच्याकडूनच प्रक्रियेच्या नावाखाली तीन लाख रुपये घेतले. आधीच आर्थिक तंगी असताना फिर्यादीने मूत्रपिंड विकण्यासाठी उसनावारी घेऊन पैसे जमवले होते. मात्र त्यांची फसवणूक करण्यात आली.

४५ वर्षीय तक्रारदार अंधेरी येथील एका खासगी कंपनीत शिपाई म्हणून काम करतात. पत्नी, मुलगा, आई आणि भावासोबत ते राहतात. त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. डोक्यावर कर्ज वाढले होते. एकेक दिवस काढणे कठीण झाले होते. कुणीच पैसे उधार देण्यास तयार नव्हते. घरखर्च भागवताना तारेवरची कसरत करावी लागत होती. घरातील सामानही विकून झाले. त्यामुळे फिर्यादीला एक उपाय दिसला. मूत्रपिंड दान केल्यास चांगले पैसे मिळतात असे तक्रारदार ऐकून होता. त्यामुळे त्याने आपले एक मूत्रपिंड विकण्याचा निर्णय घेतला. परंतु मूत्रपिंड कुठे विकायचे ? कुठून पैसे मिळतील हे माहित नव्हते.

ऑनलाईन शोध घेतला आणि सापळ्यात अडकला

मूत्रपिंड विकत घेणाऱ्यांचा त्याने ऑनलाईनवर शोध घेतला. त्यावेळी त्याला नवी दिल्ली येथील सह्याद्री रुग्णालायत मूत्रपिंड विकत घेतले जात असल्याची माहिती मिळाली. फिर्यादीने त्या रुग्णालयाच्या क्रमांकावर फोन केला. मला आर्थिक अडचण असून मूत्रपिंड विकायचे आहे, असे सांगितले. एका मूत्रपिंडाच्या मोबदल्यात १ कोटी रुपये देण्यात येतील, असे त्या व्यक्तीने सांगितले. यासाठी फिर्यादी तयार झाले. १ कोटी मिळतील आणि सारी आर्थिक अडचण दूर होईल, असे त्यांना वाटले.

उसनवारी घेऊन ३ लाख भरले

फिर्यादी १६ जुलै २०२४ रोजी त्यांच्या कार्यालयात काम करत असताना त्यांना एका क्रमांकावरून फोन आला. त्या व्यक्तीने तक्रारदाराचा रक्तगट, वय, पत्ता आदी माहिती घेतली. १ कोटी रुपये मिळतील, परंतु प्रक्रियेसाठी सुरुवातीला २ लाख ९५ हजार रुपये भरावे लागतील. मूत्रपिंड दिल्यानंतर तात्काळ १ कोटी रुपये खात्यात जमा होतील, असे त्यांना सांगण्यात आले. पंरतु फिर्यादीकडे एवढे पैसे नव्हते. मग त्या व्यक्तीने टप्प्याटप्याने तीन बॅंक खात्यात पैसे भरण्यास सांगितले. फिर्यादीने परिचितांकडून उसनवार पैसे घेतले. १८ ते ३० जुलै २०४ या १३ दिवसांच्या कालावधीत फिर्यादीने २ लाख ९५ हजार रुपये जमा केले.

टाळाटाळ करून फसवणूक

तुम्हाल लवकरच मूत्रपिंड देण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यास बोलावले जाईल असे सांगण्यात आले. मात्र फोन करणारी अज्ञात व्यक्ती वेगवेगळी कारणे देऊन टाळाटाळ करून लागली. त्यामुळे तक्रारदार वाट बघत होते. नंतर त्या अज्ञात व्यक्तीचा फोन बंद येऊ लागला. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे तक्रारदारांच्या लक्षात आले. मुळात पैशांची चणचण असल्याने एक मूत्रपिंड विकण्याचा निर्णय घेतला होता. त्यातही फसवणूक झाली आणि उधार घेतलेले सुमारे ३ लाख रुपये भरावे लागले. याप्रकरणी तक्रारदाराने सायबर हेल्पलाईनवर तक्रार केली. दहिसर पोलीस ठाण्यात गुरुवारी अज्ञात व्यक्ती विरोधात फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

हा सायबर फसवणुकीचा प्रकार आहे. आमच्याकडे तक्रार येताच आम्ही गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे, अशी माहिती दहिसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक होनमाने यांनी दिली.