मुंबई : डिजिटल अरेस्टच्या दोन प्रकरणांमध्ये सायबर पोलिसांनी गुजरात व पुण्यात कारवाई करून तिघांना अटक केली. मनी लाँडरींग व अमली पदार्थ तस्करीप्रकरणात सहभाग असल्याची भीती दाखवून या दोन प्रकरणांमध्ये मिळून सव्वादोन कोटी रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आली होती. इतर गुन्ह्यांमध्येही आरोपींचा सहभाग असल्याचा संशय असून त्याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.

पहिल्या प्रकरणात, माहिम येथील ६१ वर्षीय निवृत्त शिक्षिकेची पावणेदोन कोटी रुपयांची सायबर फसवणूक केल्याप्रकरणी मध्य प्रादेशिक सायबर पोलिसांनी दोघांना पुण्यातून अटक केली. अजय सुंदर दिवेकर (४०) व नितीन आत्मराम मोरे (४१) अशी अटक आरोपींची नावे आहेत. यापैकी दिवेकर हा लेखापाल असून पुण्यातील शिवशक्ती चौक येथील रहिवासी आहे, तर मोरे पुण्यातील लोहगाव परिसरातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तक्रादार शिक्षिकेला जानेवारी महिन्यात कुरियर कंपनीतून दूरध्वनी आला होता. दूररध्वनी करणाऱ्याने तक्रारदारांनी पाठवलेला पार्सलमध्ये पारपत्र, क्रेडिट कार्ड व एमडीएमए अमली पदार्थ सापडल्याचे सांगितले. त्यानंतर अटकेची भीती दाखवून आरोपींनी तक्रारदार महिलेला डिजिटल अटक केली व त्यांच्याकडून एक कोटी ७२ लाख २० हजार रुपये हस्तांतरित करून घेतले.

या गुन्ह्यांबाबत सायबर पोलिसांनी तपास सुरू केला असता महिलेच्या खात्यातून हस्तांतरित झालेल्या एक कोटी ७२ लाख रुपयांपैकी ३० लाख ९० हजार रुपये अटक आरोपी दिवेकरच्या खात्यात जमा झाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याच्या बँक खात्यामार्फत दिवेकरचा मोबाइल क्रमांक मिळवला. त्यानंतर तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास केला असता आरोपी पुण्यातील फुरसुंगी पोलीस ठाण्यात हद्दीत असल्याचे निष्पन्न झाले. त्याचा शोध घेऊन ताब्यात घेण्यात आले.

या गन्ह्यांत नितीन मोरे याने १५ हजार रुपये कमिशन स्वीकारले होते, अशी माहिती उघड झाल्यानंतर दोन्ही आरोपींना याप्रकरणी नोटीस देऊन अटक करण्यात आली याशिवाय मनी लाँडरींग प्रकरणात सहभागी असल्याची भीती दाखवून डिजिटल अटक करून ४९ लाखांची सायबर फसवणूक केल्याप्रकरणी गोपाल राम घमंडा राम (३०) या आरोपीला सायबर पोलिसांनी गुजरातमधून अटक केली. तक्रारदारांच्या बँक खात्यातून १४ लाख रुपये गुजरातमधील अहमदाबाद येथील राहणाऱ्या व्यक्तीच्या खात्यात जमा झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी शोध घेतला असता ते बँक खाते आरोपी गोपाळचे असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलीस पथकाने गुजरातमध्ये जाऊन राहत्या घरातून आरोपी गोपाळला अटक केली. आरोपीच्या बँक खात्यावर सायबर फसवणूकीतील इतर रक्कमही आल्याचा संशय आहे. त्याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.