मुंबई : दादरमध्ये वर्षानुवर्ष मांसाहारप्रेमींच्या जिभेचे चोचले पुरविणाऱ्या सुप्रसिद्ध चैतन्य हॉटेलमध्ये आता न जेवणाचा इशारा खुद्द हॉटेल प्रशासनानेच खवय्यांना दिला आहे. हा सल्लावजा इशारा त्यांनी हॉटेलच्या चविष्ट मालवणी जेवणाची जाहिरात करण्यासाठी दिला असून या क्लृप्तीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

‘एकदा इथली चव चाखलीत की ती तुम्ही विसरणे अशक्य आहे. त्यामुळे तुम्ही जोखीम पत्करून इथे जेवू शकता.’ अशा आशयाची पोस्ट हॉटेल प्रशासनाने त्यांच्या अधिकृत पेजवरून दिली आहे. ‘आमच्याकडे खाऊ नका’ अशा थेट शब्दांत ग्राहकांना सावधगिरीचा सल्ला देत या हॉटेलने आपली खास ओळख अधोरेखित केली आहे.

मुंबईत राहणाऱ्या कोकणवासीयांमुळे मालवणी खाद्यसंस्कृतीचा ठसा यापूर्वीच शहरात ठळकपणे उमटला आहे. मुंबईत अनेक भागात मालवणी खाद्यसंस्कृती जपणारी हॉटेल्स आहेत. त्यात चैतन्य हॉटेल हा पर्याय खाद्यप्रेमींच्या विशेष जिव्हाळ्याचा आहे. अनेक दशकांपासून या हॉटेलने जेवणाचा दर्जा, स्वच्छता, चवीमुळे ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. असे असले तरीही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेलने भन्नाट कल्पना लावून जाहिरातबाजी केली आहे.

हॉटेलच्या फेसबुक पेजवर केलेल्या पोस्टमध्ये ‘आम्ही चैतन्यमध्ये जेवू नका अशी सक्त ताकीद देत आहोत, असा इशारा देण्यात आला आहे. त्याचे कारण स्पष्ट करताना असे म्हटले आहे की, “एकदा इथली चव चाखलीत की ती तुम्ही विसरणे अशक्य आहे. इथला खेकडा मसाला, प्रॉन्स थाळी खाल्ली किंवा इथली सोलकढी प्यायलीत, की ही चव तुम्हाला इतर कुठेही मिळणार नाही, याची खात्री पटेल. एकदा का तुम्ही आमच्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या अस्सल मालवणी रेसिपीज, आमच्या समुद्री खाद्यपदार्थांची अप्रतिम चव, ताजेपणा, आणि अनेक दशकांपासून जपलेल्या चवींची परंपरा अनुभवली, तर तुम्ही कायमचे इथेच रमून जाल. त्यामुळे तुम्ही जोखीम पत्करून इथे जेवू शकता.’ चैतन्य हॉटेलने अशा पद्धतीने ग्राहकांना सावधगिरीचा सल्ला देत आपली खास ओळख अधोरेखित केली आहे.

आधुनिक मार्केटिंगचा धडा

आजच्या काळात अनेक हॉटेल्स ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध सवलती, कॉम्बो ऑफर्स अशा युक्त्या वापरतात. पण चैतन्य भोजनगृहाने दिलेला हा उलटा इशारा मार्केटिंगचा वेगळा धडाच आहे.

…अशी झाली ‘चैतन्य’ची सुरुवात

चैतन्य अस्सल मालवणी भोजनगृहाच्या सुरेखा वाळके या मालकीण आहे. मराठी उद्योजिका म्हणून त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी १९९४ साली मालवणात छोटी खानावळ सुरू केली होती. त्यानंतर २००९ मध्ये मुंबईतील दादर भागात त्यांनी चैतन्य हॉटेल सुरू केले.