राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याबाबत येत्या दोन-तीन दिवसांत निर्णय जाहीर केला जाईल, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी दिली. तर महाविद्यालये व शिक्षणसंस्था सुरू करण्याची विद्यापीठांची तयारी असल्याचे कुलगुरूंनी राज्यपालांबरोबर झालेल्या बैठकीत स्पष्ट केले.

करोनाचा संसर्ग वाढल्याने मार्च २०२० पासून राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये व विद्यापीठे बंद करण्यात आली. त्यानंतर ऑनलाइन शिक्षण सुरू करण्यात आले. मागील दोन-तीन महिन्यांपासून करोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्यामुळे पहिल्या टप्प्यात २३ नोव्हेंबर २०२० पासून ९ वी ते १२ वीचे वर्ग सुरू करण्यात आले. त्यानंतर २७ जानेवारीपासून ५ वी ते ८ वीचे वर्ग सुरू करण्यात आले.

विद्यापीठे आणि महाविद्यालये सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय लवकरत जाहीर केला जाईल. आरोग्य सुरक्षेची काळजी घेत लगेच पूर्ण क्षमतेने महाविद्यालये सुरू न करता पहिल्या टप्प्यात काही टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती असावी, असा विचार असल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

राज्यपालांकडूनही आढावा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शुक्रवारी राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंची दूरचित्रसंवाद माध्यमातून बैठक घेऊन महाविद्यालयांचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करण्याबाबत आढावा घेतला. राज्यातील उच्च शिक्षण संस्था व महाविद्यालये सुरू करण्याची विद्यापीठांची तयारी आहे, शासनाच्या अनुमतीची आवश्यकता आहे, असे कु लगुरूंनी राज्यपालांना सांगितले. सर्वच विद्यापीठांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पदे रिक्त आहेत, त्यामुळे विद्यापीठ प्रशासन चालविणे कठीण झाले आहे. आता ही पदे भरण्याची अनुमती द्यावी, अशी मागणीही कुलगुरूंनी राज्यपालांकडे केली. राज्यात पाचवी ते आठवीचे वर्ग सुरू झाले, अशा वेळी महाविद्यालये व विद्यापीठांतील वर्ग सुरू न होणे, विसंगत व विपरीत वाटते, अशी टिप्पणी राज्यपालांनी केली. महाविद्यालये दोन पाळ्यांमध्ये सुरू करता येतील का, याचा विद्यापीठांनी विचार करावा, अशा सूचना राज्यपालांनी केल्या.