पावसाळा संपताना नेमेचि येणारी डेंग्यूची साथ यावेळी सप्टेंबरमध्येच मुंबईत आली असून खासगी दवाखाने तसेच रुग्णालयातील डेंग्यू रुग्णांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. पालिकेकडील रुग्णांची संख्या आठवडाभरात दुप्पट झाली आहे. डेंग्यूवर घरीच पूर्ण उपचार घेणे शक्य असल्याने नागरिकांनी घाबरू नये, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
शहरातील ७० टक्के रुग्ण उपचारांसाठी खासगी दवाखान्यात जात असल्याने डेंग्यू रुग्णांची नेमकी संख्या समोर येत नसली तरी पालिका रुग्णालयातील रुग्णांच्या वाढीनुसार डेंग्यूचा प्रभाव वाढत असल्याचे जाणवते. ऑगस्टच्या अखेरच्या आठवडय़ात पालिका रुग्णालयात डेंग्यूचे २३ रुग्ण दाखल झाले होते. १ ते ७ सप्टेंबरमध्ये ३४ रुग्ण तर ८ ते १४ सप्टेंबरमध्ये डेंग्यूचे ५२ रुग्ण उपचारांसाठी आले. पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागानेही डेंग्यूच्या प्रतिबंधक उपायांकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.
साधारण ऑक्टोबरमध्ये डेंग्यूची साथ येते. मात्र यावेळी ऑगस्ट अखेरीपासूनच डेंग्यूचे रुग्ण दिसू लागले आहे. विषाणूजन्य ताप, डेंग्यू आणि मलेरिया या तिन्ही आजारांचे रुग्ण याच क्रमाने दिसत आहेत. या तीनही आजारांचे प्रमुख लक्षण ताप असल्याने इतर लक्षणांवरून अचूक निदान करणे गरजेचे आहे, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉ. सुहास पिंगळे म्हणाले. डेंग्यूवर घरीच योग्य उपाय करता येतात व गुंतागुंत होण्याचे प्रमाण कमी आहे.
इमारतींत डासांच्या अळ्या
डेंग्यूचा प्रभाव वाढू नये यासाठी पालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून डासांच्या अळ्या नष्ट करण्याचे काम अधिक व्यापक प्रमाणात हाती घेण्यात आले आहे. सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या १५ दिवसांत तब्बल १५०४ ठिकाणी डेंग्यू विषाणूंचे वाहक असलेल्या एडिस प्रजातीच्या डासांच्या अळ्या सापडल्या. यातील केवळ १० टक्के म्हणजे १५४ ठिकाणे झोपडपट्टीतील होती व ९० टक्के म्हणजे १३५० ठिकाणे ही मध्यम-उच्चभ्रू वस्तीतील होती.