डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेकडून सार्वजनिक ठिकाणी डास निर्मूलनासाठी ठोस उपाययोजना करण्यात येत आहेत. मात्र जनजागृती करूनही गृहनिर्माण सोसायटय़ा आणि झोपडपट्टय़ांमधील पाण्याच्या पिंपामध्ये डासांच्या अळ्या सापडत असल्याने पालिका अधिकारी-कर्मचारी हैराण झाले आहेत. या मोहिमेत नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे पालिका प्रशासनही चिंतेत पडले आहे. दरम्यान, गेल्या आठवडय़ामध्ये सूचना करूनही डास निर्मूलनासाठी उपाययोजना करण्यात टाळाटाळ करणाऱ्या १२३ जणांवर पालिकेने कारवाईचा पडगा उगारला आहे. या नागरिकांना आता कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.
मुंबईमध्ये डेंग्यूने डोके वर काढल्यानंतर तात्काळ पालिकेच्या आरोग्य विभागाने डास निर्मूलनासाठी धडक मोहीम सुरू केली आहे. पालिका अधिकारी-कर्मचारी ठिकठिकाणी फिरून डासांच्या उत्पत्ती स्थानांचा शोध घेत आहेत. अळ्या आणि डासांचा नायनाट करण्यासाठी कीटकनाशक विभागामार्फत धूम्रफवारणी आणि कीटकनाशक फवारणी करण्यात येत आहे. कचरा साचू नये याचीही काळजी घेण्यात येत आहे. त्याचबरोबर नागरिकांना सावध करण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर जनजागृती हाती घेण्यात आली आहे. स्वच्छता मोहीम राबवितानाच आरोग्य विभागामार्फत सार्वजनिक ठिकाणे, गृहनिर्माण सोसायटय़ा, झोपडपट्टय़ा आदी ठिकाणी जनजागृती करण्यासाठी भित्तीपत्रके चिकटविण्यात आली आहेत. तसेच पालिका कर्मचारी आणि आरोग्य स्वयंसेविकांच्या माध्यमातून गृहनिर्माण सोसायटय़ा आणि प्रामुख्याने झोपडपट्टय़ांमधील रहिवाशांना डास निर्मूलनाबाबत मार्गदर्शनही करण्यात येत आहे. मात्र तरीही दर दिवशी किमान २५ ते ३० घरांमध्ये डासांच्या अळ्या आढळून येत आहेत. डास निर्मूलनाची सूचना करूनही १२३ रहिवाशांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे ६ रहिवाशांवर महानगर दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात खटला दाखल होईल, असे नारिंग्रेकर म्हणाले.
शोभेची झाडे, एसीचा डकमध्येही अळ्या
गृहनिर्माण सोसायटय़ांमधील घरांत शोभेची झाडे, एसीसाठी उभारलेला डक, तसेच झोपडपट्टय़ांमधील पाण्याचे पिंप, ड्रम आदींमध्ये डासांच्या अळ्या सापडत आहेत. पाण्याचे पिंप, ड्रममध्ये कीटकनाशक औषध टाकण्यात येत आहे. तसेच घरातील शोभेच्या झाडांसाठी वापरण्यात येणारे पाणी नियमितपणे बदलण्यात येत नसल्यामुळे त्यात डासांच्या अळ्या होत आहेत. नागरिकांना याबाबत काळजी घेण्याची सूचना करण्यात येत आहे. परंतु नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्यामुळे डासांचे समूळ उच्चाटन करण्यात विलंब होत असल्याची खंत कीटकनाशक विभागाचे राजन नारिंग्रेकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केली.
संग्रहित लेख, दिनांक 10th Nov 2014 रोजी प्रकाशित
पिंपात जन्मले डास डेंग्यूचे!
डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेकडून सार्वजनिक ठिकाणी डास निर्मूलनासाठी ठोस उपाययोजना करण्यात येत आहेत.
First published on: 10-11-2014 at 06:54 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dengue spread flies