अज्ञातांविरुद्ध ‘एफआयआर’; मुख्यमंत्र्यांचे तपासाचे आदेश
देवनार कचराभूमीवर गुरुवारी पहाटेपासून लागलेली आग अखेर शनिवारी दुपारी आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले. मात्र तीन दिवस धुमसत असलेल्या हजारो टन कचऱ्यामधून बाहेर पडलेल्या वायूने परिसरातील नागरिकांना भोगाव्या लागलेल्या आरोग्याच्या समस्यांची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. या आगीमागे काही घातपात कारणीभूत आहे काय, याच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असून, त्या दिशेने पडताळणी करण्याची सूचनाही त्यांनी पोलीस आयुक्तांना केली आहे.
देवनार कचराभूमीत आग लावली गेल्याचा संशय असल्याने महापालिकेने त्याबाबत पोलिसांकडे प्रथमदर्शनी माहिती अहवाल (एफआयआर) नोंदविला आहे. या आगीमागे कंत्राटदारांचे हितसंबंध आहेत, अशीही चर्चा सुरू असून त्याबाबतही पोलीस तपास करणार आहेत. महापालिकेच्या सूचनेवरून पोलिसांनी तीन-चार अज्ञात व्यक्तींविरुद्ध ‘एफआयआर’ नोंदविला असल्याचे सूत्रांनी सांगितले. कचराभूमीवर लागलेली आग शुक्रवारी आटोक्यात आल्याचे वाटत असतानाच मध्यरात्री पुन्हा एकदा धुराचे लोट हवेत पसरू लागले. दरुगधी व काळ्या धुराने परिसरातील नागरिक त्रस्त झाले. शनिवारी पहाटे आगीचे वाढलेले स्वरूप पाहून आयुक्त अजय मेहता यांनी अग्निशमन दलाला आग विझवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आदेश दिले. १४ अग्निशामक बंब, पाण्याचे आठ टँकर, दोन मिनी वॉटर टेंडर यांच्या मदतीने अग्निशमन दलाचे दीडशे जवान-अधिकारी शनिवारी आग विझवण्याच्या कामाला लागले होते. आग लवकर नियंत्रणात आणण्यासाठी ‘जेल कूल सोल्यूशन’चा पहिल्यांदाच वापर केला गेला. तापमान तातडीने कमी करण्यासाठी ही पद्धत वापरली जाते. शनिवारी दुपारी आग आटोक्यात आली असली तरीही शनिवारी रात्रीही आग नियंत्रणाचे काम सुरूच ठेवण्याच्या सूचना अग्निशमन दलाला देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, या धुरामुळे संपूर्ण मुंबईच काळवंडली असून देवनार, गोवंडी परिसरातील नागरिकांना धुराचा व दरुगधीचा सामना करावा लागत आहे. यामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्य समस्यांवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून नागरिकांना नाक व तोंड झाकले जाईल, अशा पद्धतीने ओला रुमाल बांधण्याच्या तसेच काळा चष्मा वापरण्याच्या सूचना सार्वजनिक आरोग्य विभागाने दिल्या आहेत. धुरामुळे गोवंडी, देवनार परिसरातील शाळा बंद ठेवल्या गेल्या.