मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मत; अरुण बोंगीरवार फाऊंडेशन पुरस्कारांचे वितरण
प्रशासनाने जनतेबरोबर संवाद साधणे आवश्यक असून जनतेच्या प्रश्नांना न्याय न दिल्यास सरकारविरोधकांना किंवा नक्षलवादाला पाठबळ मिळते, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे केले. सत्तापदांवर असताना विनय, सदसद्विवेकबुद्धी जागृत ठेवून लोकाभिमुखता व सकारात्मकता बाळगूनच काम करणे महत्त्वाचे आहे, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
निवृत्त मुख्य सचिव अरुण बोंगीरवार यांच्या स्मरणार्थ त्यांचे कुटुंबीय व मित्र परिवाराने स्थापन केलेल्या ‘अरुण बोंगीरवार फाऊंडेशन’तर्फे बोंगीरवार यांच्या जन्मदिवशी शनिवारी, विविध क्षेत्रांमध्ये चांगले काम करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
सनदी अधिकारी अभिजित बांगर, नक्षलवादी भागात काम केलेले भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी डॉ. अभिनव देशमुख, आदिवासी मुलांची शाळेमधील उपस्थिती आणि गुणवत्ता वाढावी म्हणून काम करणाऱ्या अश्विनी सोनावणे, कांदळवनांच्या जतनासाठी काम करणारे एन. वासुदेवन, निसर्ग पर्यटन क्षेत्रातील जितेंद्र रामगावकर हे या पुरस्कारांचे मानकरी ठरले. एक लाख रुपये रोख व प्रमाणपत्र असे पुरस्कारांचे स्वरूप आहे आणि राज्य सरकारच्या ‘यशदा’ या संस्थेच्या सहकार्याने अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
माजी मुख्य सचिव बोंगीरवार यांनी आपल्या कारकीर्दीत लोकाभिमुखता व सकारात्मकता बाळगून काम केले आणि त्यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारविजेत्यांचे कामही त्याच पद्धतीने सुरू आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढले.
‘लोकांच्या प्रश्नांकडे सकारात्मकतेतून पाहून ते सोडवल्यास कलावंतांप्रमाणे सृजनाचा आनंद मिळू शकतो. काही तरी करून दाखविण्याची तळमळ, जिद्द असलेल्या अधिकाऱ्यांमुळे बरीच चांगली कामे होतात, हे पुरस्कार विजेत्या अधिकाऱ्यांनी दाखवून दिले आहे. उल्लेखनीय कामाला अशा पुरस्कारांमधून शाबासकीची थाप मिळाली की अन्य अधिकाऱ्यांनाही प्रेरणा मिळते,’ असे उद्गार मुख्यमंत्र्यांनी या वेळी काढले.
नक्षलवादी भागात काम केलेल्या देशमुख यांच्या कामाचा उल्लेख करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनतेशी संवादाचे महत्त्व अधोरेखित केले. शासकीय यंत्रणेकडून न्याय मिळावा, अशी जनतेची अपेक्षा असते आणि तसे न झाल्यास सरकारविरोधी शक्तींना पाठबळ मिळते, असे स्पष्ट केले. बांगर यांनी आदिवासी क्षेत्रात काम करण्याची तयारी दाखवून लोकांमध्ये थेट मिसळून व अभिनव कल्पना राबवून केलेल्या कामाचे फडणवीस यांनी कौतुक केले. भामरागडमध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा वाढावा यासाठी स्थानिक भाषेत क्रमिक पुस्तके उपलब्ध करून वेगवेगळे उपक्रम राबविलेल्या आश्विनी सोनावणे यांच्या कामाचा उल्लेख करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाधान व्यक्त केले. पुरस्कारांविषयीची भूमिका मांडून श्रीमती लता बोंगीरवार यांनी आभार मानले. मुख्य सचिव अजोय मेहता या वेळी उपस्थित होते. पुरस्कार विजेत्या अधिकाऱ्यांनी काम करत असताना आलेले अनुभव या वेळी कथन केले.
पुरस्कार विजेत्यांच्या निवडीसाठी माजी मुख्य सचिव डी.के. जैन यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये ‘एचडीएफसी’ बँकेचे संस्थापक दीपक पारेख, ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर, ‘जेएसडब्ल्यू फाऊंडेशन’च्या अध्यक्षा संगीता जिंदाल, सनदी अधिकारी आनंद लिमये यांचा समावेश होता.