VIDEO: "ते म्हणाले रिफायनरी झाली तर झाडाला आंबेच येणार नाहीत, पण...", देवेंद्र फडणवीसांचं कोकण महोत्सवात वक्तव्य | Devendra Fadnavis criticize opponent over Refinery projects in Kokan Mango production | Loksatta

VIDEO: “ते म्हणाले रिफायनरी झाली तर झाडाला आंबेच येणार नाहीत, पण…”, देवेंद्र फडणवीसांचं कोकण महोत्सवात वक्तव्य

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणातील रिफायनरी प्रकल्पांवरून विरोधकांवर सडकून टीका केली. तसेच या लोकांना कोकण मागास ठेऊन, लोकांच्या भावना भडकवून, मतं घेऊन राजकारण करायचं आहे, असा गंभीर आरोप केला.

VIDEO: “ते म्हणाले रिफायनरी झाली तर झाडाला आंबेच येणार नाहीत, पण…”, देवेंद्र फडणवीसांचं कोकण महोत्सवात वक्तव्य
देवेंद्र फडणवीस (कोकण महोत्सवात बोलताना- सौजन्य – युट्यूब)

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकणातील रिफायनरी प्रकल्पांवरून विरोधकांवर सडकून टीका केली. तसेच या लोकांना कोकण मागास ठेऊन, लोकांच्या भावना भडकवून, मतं घेऊन राजकारण करायचं आहे, असा गंभीर आरोप केला. यावेळी फडणवीसांनी कोकणात रिफायनरी झाली तर झाडाला आंबेच येणार नाही, अशी टीका होत असल्याचं सांगत त्यांना प्रत्युत्तर दिलं. ते मंगळवारी (६ डिसेंबर) मुंबईत स्वराज्यभूमी कोकण महोत्सवात बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आम्ही सुरुवातीलाच सांगितलं होतं की कोकणात येणारी रिफायनरी ग्रीन रिफायनरी असेल. काहीही झालं तरी कोकणात एकही प्रदुषणकारी उद्योग आम्ही आणणार नाही. ग्रीन रिफायनरी आणि इमिशन-डिस्चार्ज नाही असे नवीन तंत्रज्ञानाचे उद्योगच कोकणात आणू. याशिवाय त्यांच्यावर एक अट टाकली होती की, जिथं रिफायनरी होईल तिथं त्याच परिसरात ५,००० एकरावर फक्त ग्रीनरी तयार करावी लागेल.”

“रिफायनरी प्रकल्प झाल्यावर आंबाच येणार नाही”

“या प्रकारच्या रिफायनरीमुळे कोकणातील एक लाख लोकांना थेट रोजगार आणि पाच लाख लोकांना अप्रत्यक्ष रोजगार मिळेल. काही लोकांनी खूपच चुकीच्या गोष्टी पसरवल्या. ते म्हणाले रिफायनरी प्रकल्प झाल्यावर आंबाच येणार नाही,” असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला.

हेही वाचा : VIDEO: शिंदे गटातील आमदाराने भाजपा नेत्यांचा एकेरी उल्लेख करत थेट बाप काढला, म्हणाले, “ते पाकिस्तानात जन्माला…”

“देशातील सर्वात महत्त्वाची रिफायनरी गुजरातमध्ये”

देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, “खरंतर आज देशातील सर्वात महत्त्वाची रिफायनरी गुजरातमध्ये आहे. ती रिफायनरी जामनगरमध्ये असून रिलायन्सची आहे. त्या रिफायनरी परिसरातूनच कोकणाच्या खालोखाल सगळ्यात जास्त आंबा निर्यात होतो. हा आंबा जगभरात जातो. त्यामुळे काही लोकांना कोकणाचा विकास नको आहे.”

व्हिडीओ पाहा :

“काहींना लोकांना भडकवून मतं घ्यायची आहेत”

“या लोकांना कोकण मागास ठेऊन, लोकांच्या भावना भडकवून, मतं घेऊन राजकारण करायचं आहे. आम्हाला कोकणाचा विकास करायचा आहे. त्यामुळे कोकणात आम्ही रिफायनरी करूनच दाखवू. कोकणी माणसाच्या हाताला काम देऊन दाखवू. त्याचवेळी कोकणाचं पर्यावरण आहे त्यापेक्षा चांगलं करून दाखवू, हा आमच्या सरकारचा निर्धार आहे,” असंही फडणवीसांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 11:45 IST
Next Story
मुंबईः अंधेरीतील तरूणाची ५० लाखांची सायबर फसवणूक