बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन कंपनी आणि म्हाडा हे वर्षांनुवर्षांचे समीकरण अबाधित राहावे, यासाठी वेळोवेळी पायघडय़ा घालणाऱ्या ‘म्हाडा’ने आताही धारावी प्रकल्पात चक्क आराखडय़ात बदल केल्याचे स्पष्ट झाले आहे. शिर्के कंपनीला सोयीचे व्हावे, म्हणूनच हा निर्णय झाला असला तरी आराखडय़ात केलेला बदल शिर्के बिल्डरसाठी नाही, असा युक्तिवाद करीत म्हाडाने मात्र कानावर हात ठेवले आहेत. त्यामुळे यामागील गौडबंगाल वाढले आहे. अलीकडे शिर्के बिल्डरला प्रति चौरस फुटात भरमसाठ वाढ देण्याची किमयाही म्हाडा अधिकाऱ्यांनी केली होती.
गेली अनेक वर्षे रखडलेला धारावी प्रकल्प मार्गी लागावा यासाठी पाचपैकी एका सेक्टरच्या पुनर्विकासाची जबाबदारी शासनाने म्हाडावर सोपविली. म्हाडानेही या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी निविदा मागविण्याचे नाटक केले. या निविदेत ‘नेपच्यून ग्रुप’ आणि ‘शिर्के कन्स्ट्रक्शन कंपनी’ सरस ठरली. अखेरीस शिर्के कंपनीच्या पदरात कंत्राट टाकण्यात आले. म्हाडासाठी सर्वाधिक बांधकाम करण्याचा अनुभव असल्यामुळे शिर्के कंपनीची निवड झाल्याचा दावा करण्यात आला असला तरी निविदेतील विशिष्ट अटींमुळेच शिर्के कंपनीला झुकते माप मिळाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
शिर्के कंपनीला चौरस फुटामागे तीन हजार रुपयांपेक्षा अधिक दर अलीकडेच देण्यात आला होता. शिर्के कंपनीकडून केले जाणारे बांधकाम पाहता हा दर पंधराशे ते दोन हजार रुपयांपेक्षा अधिक असू नये, असे म्हाडातीलच काही अभियंत्यांचे म्हणणे आहे. प्रति चौरस फूट तीन हजार रुपयांत दर्जेदार बांधकाम होते. परंतु शिर्के कंपनीने आतापर्यंत बांधलेल्या म्हाडा इमारतींना गळतीने पोखरले आहे. तसेच इमारतींच्या मजबुतीबाबतही रहिवाशांमध्ये साशंकता आहे.    या इमारतींसाठी सुरुवातीला सादर करण्यात आलेल्या आराखडय़ामध्ये बदल करण्यात आला. या संदर्भातील प्रती ‘लोकसत्ता’कडे आहेत. सुरुवातीला सादर करण्यात आलेल्या आराखडय़ात बहुउद्देशीय खोलीचा समावेश नव्हता. मात्र नंतरच्या आराखडय़ात त्याचा समावेश करण्यात आल्याचा दावा म्हाडाने केला आहे. परंतु पहिल्या आराखडय़ानुसार काम झाले असते तर शिर्के कंपनीला त्यांच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात अडचण आली असती. त्यामुळे शिर्के कंपनीला हवा तसा आराखडा तयार करण्यात आल्याचे एका अभियंत्याने सांगितले.
याबाबत मुंबई गृहनिर्माण मंडळाचे मुख्य अधिकारी निरंजनकुमार सुधांशु म्हणाले की, पूर्वीच्या आराखडय़ात काही त्रुटी होत्या. त्यामुळे त्यात सुधारणा करण्यात आल्या. याचा संदर्भ बिल्डरशी कसा जोडता, असा सवाल सुधांशु यांनी केला. सुधांशु यांनी बदल झाल्याचे मान्य केले. पण म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य अधिकारी सतीश गवई यांनी मात्र, आराखडय़ात बदल केलेला नाही, असे सांगितले. म्हाडाकडून धारावी पुनर्विकास प्राधिकरणाला आराखडे सादर केले जातात. मंजूर केलेल्या आराखडय़ाप्रमाणेच बिल्डरला काम करावे लागते, असे ते म्हणाले.  
धारावीतील सेक्टर पाच क्रमांकाच्या प्रकल्पात तीनशे चौरस फुटाची ३५६ घरे शिर्के बिल्डर्सकडून बांधली जाणार आहेत. १४ माळ्याच्या तीन विंग असलेल्या इमारती बांधण्यात येणार आहेत.