वसई : पवईतील मुलांच्या ओलीस नाट्याचा सुत्रधार असलेला माथेफिरू रोहीत आर्या याचा पोलीस गोळीबारात मृत्यू झाला. मुलांची सुटका करताना खरंच त्याला मारण्याची गरज होती का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. पोलीस अधिकाऱ्यांमध्ये याबद्दल वेगवेगळे मतप्रवाह दिसून येतात. काही चकमक फेम अधिकाऱ्यांनी ही कारवाई योग्य असल्याचे सांगितले तर अनेक माजी अधिकाऱ्यांना ही चकमक अयोग्य असल्याचे मत व्यक्त केले आहे.
गुरूवारी दुपारी पवई मधील एका स्टुडिओमध्ये रोहीत आर्या (५०) या व्यक्तीने लघुपटाच्या मुलाखतीसाठी आलेल्या १७ मुलांसह दोघांना ओलीस ठेवले होते. शासनाकडे केलेल्या कामाचे पैसे थकल्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून त्याने हे कृत्य केल्याचे चित्रफितीत म्हटले होते. सुमारे अडीच तासांच्या नाट्यानंतर पोलिसांनी मुलांची सुटका केली. मात्र त्यावेळी त्याच्यावर गोळी झाडण्यात आल्याने आर्याचा मृत्यू झाला. आर्याकडे केवळ एक एअर गन होती, तसेच काही रसायने होती. जर सकृतदर्शनी तो धोकादायक वाटत नव्हता तर त्याला का मारले, असा सवाल आता उपस्थित झाला आहे.
माजी पोलीस महानिरीक्षक सुधाकर सुराडकर यांनी पोलिसांची ही कारवाई अयोग्य असल्याचे सांगितले. तो एकटा असल्याने त्याच्यावर नियंंत्रण मिळविणे शक्य होते. त्याने पोलिसांवर गोळीबार किंवा हल्ला केला नव्हता. मुलांची सुटका झालीच होती. त्यामुळे त्याला मारणे चुकीचे होते असे ते म्हणाले. जे अक्षय शिंदेच्या प्रकरणात घडले तेच इथेही घडले असे ते म्हणाले.
माजी चकमक फेक अधिकारी प्रदीप शर्मा यांनी मात्र या कारवाईचे समर्थन केले आहे. त्याच्या हातात एअर गन होती. ते नेमके शस्र काय होते ते सुरवातीला माहित नव्हते. तो मुलांना धोका पोहोचवू शकला असता, त्यामुळे त्याच्यावर केलेला गोळीबार योग्य होता, असेही शर्मा यांनी सांगितले.
आरोपीने बंदिस्त सभागृहात मुलांना ओलीस ठेवले होते. ज्वलनशील पदार्थ पसरवून ठेवले होते. तो माथेफिरू होता. काहीही करू शकला असता. त्यामुळे त्याच्यावर गोळी झाडावी लागली, असे पवई पोलिसांनी सांगितले.
चकमकीतील मृत्यू
पोलीस दलात ‘चकमक’ नावाचा कायदेशीर प्रकार अस्तित्वात नाही. चकमकीत गुन्हेगारांना ठार करावे, असे कुठेही नमूद नाही. मात्र पोलिसांवर हल्ला झाला तर स्वसंरक्षणार्थ गोळीबार केला जाऊ शकतो. त्यामुळे पोलीस ‘आरोपीने हल्ला केला आणि स्वरंक्षणार्थ गोळीबार केला’ असे सांगून त्याला चकमकीतील मृत्यू संबोधतात. त्यामुळे आतापर्यंत अनेक चमकमी वादग्रस्त ठरल्या आहेत.
