दर्शनासाठी येणाऱ्यांना मुखपट्टी, सॅनिटायझर, पाकीटबंद प्रसाद

मुंबई : करोनामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याच्या राज्य सरकारच्या आवाहनाला गणेशोत्सव मंडळांनी प्रतिसाद दिला असला तरी प्रत्यक्षात सामाजिक अंतर राखण्याची कसरत करत उत्सव साजरा करणे कार्यकर्त्यांकरिता कमालीचे कठीण होत आहे. आरती, भाविकांचे दर्शन, मंडपात पाळावयाच्या सूचना यांबाबतही फारशी काटेकोर अंमलबजावणी होताना दिसत नाही.

आरतीला केवळ पाच लोकांनी मंडपात उपस्थित राहावे, इतर वेळीही मंडपात कमीत कमी कार्यकर्त्यांचा वावर असावा, मंडपात दर्शनाला न येता ऑनलाइन दर्शन द्यावे, असे नियम यंदाच्या गणेशोत्सवासाठी घालून देण्यात आले होते. परंतु या नियमांचे पालन करणे मंडळांना जड जात आहे. त्यात साधेपणाने उत्सव साजरा करावा लागत असल्याने कार्यकर्त्यांमध्येही उदासीनता आहे. ‘गणेशोत्सवासाठी कार्यकर्ते वर्षभर वाट पाहात असतात. सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर मंडपात पाचहून अधिक लोकांना बसण्यास मज्जाव असला तरी अधिक कार्यकर्ते जमल्यास त्यांना हाकलता येत नाही. निर्जंतुकीकरण आणि सुरक्षिततेची काळजी घेतच आहोत. परंतु नियमांचे पालन करणे काहीसे अवघड वाटत आहे,’ असे विविध मंडळातील कार्यकर्त्यांनी सांगितले. ‘दर्शनासाठी बाहेरील लोकांना एकवेळ अडवता येईल. परंतु वर्षांनुवर्षे आस्था ठेऊन असलेल्या स्थानिक लोकांना दुखावता येत नाही,’ असे लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाचे सचिव स्वप्निल परब यांनी सांगितले. तर ‘खेतवाडी गणेशोत्सवासाठी प्रसिद्ध असल्याने आजही दिवसातून वीस-तीस लोक तरी बाहेरून येतातच. अशा वेळी त्यांना दुखावण्यापेक्षा मुखपट्टी, सॅनिटायझर देऊन आम्ही दर्शन देतो,’ असे ‘खेतवाडी सहावी गल्ली गणेशोत्सव मंडळा’चे किरण शिंदे यांनी सांगितले.

रात्रीची मुशाफिरी कायम

गणेशोत्सवात रात्रभर मुंबईभर फिरणाऱ्यांची संख्या अधिक आहे. सध्या गणेश दर्शनसाठी घराबाहेर पडू नका, असे सांगितले असतानाही ठिकठिकाणच्या गणेशमूर्ती पाहण्यासाठी लोक बाहेर पडत आहेत. लालबाग, खेतवाडी, गिरगाव परिसरात असे दुचाकीस्वार रात्री सर्रास पाहायला मिळतात. ‘दिवसा येणाऱ्यांची संख्या कमी आहे. परंतु रात्री शे-दीडशे लोक लालबाग परिसरात येत असतात,’ अशी माहिती काळाचौकी पोलिसांकडून मिळाली. तर मंडळांमध्ये सामाजिक अंतर पाळण्याचे भान केवळ दिवसापुरते मर्यादित राहिल्याचे दिसते. रात्री ३० ते ४० कार्यकर्ते एकत्र येऊन पत्त्यांचे डाव रंगलेले बऱ्याच मंडळांत पाहायला मिळाले…