मराठी चित्रपटसृष्टीला ‘एक डाव भुताचा’सारखे अनेक यशस्वी चित्रपट देणारे दिग्दर्शक रवींद्र विश्वनाथ नमाडे यांचे सोमवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पुणे येथील त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. ते ६५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
‘रेशीमगाठी’, ‘एक डाव भुताचा’, ‘खरं कधी बोलू नये’ आदी चित्रपटांचे दिग्दर्शन नमाडे यांनी केले आहे. नमाडे यांच्या निधनाने कुशल दिग्दर्शक हरपल्याची भावना मराठी चित्रपटसृष्टीत व्यक्त होत आहे. त्यांच्या ‘एक डाव भुताचा’ या चित्रपटाने चांगले यश मिळवले होते. १९८२ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन नमाडे यांनी केले होते. या चित्रपटात दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ, रंजना हे मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाला राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला होता. तसेच चित्रपटाच्या दिग्दर्शनासाठी रवींद्र नमाडे यांना ‘सवरेत्कृष्ट दिग्दर्शना’चा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.