धवल कुलकर्णी

सकाळी मॉर्निंग वॉकला जाताना समुद्राच्या अवतीभोवती दिसणाऱ्या सीगल पक्षांना बिस्किट, शेव किंवा फरसाण खायला घालत आहात? तर सावधान…

तुमच्या या पक्षी प्रेमामुळे फ्लेमिंगो किंवा सीगल यांच्या पचनक्रियेवर आणि प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. लोकांमध्ये याबाबत जनजागृती करण्यासाठी महाराष्ट्र वनखात्याच्या कांदळवन कक्ष मुंबई याच्यामार्फत राबवण्यात येत आहे. मुंबई शहर उपनगर क्षेत्रांमध्ये समुद्रकिनारी व खाडी व दलदली क्षेत्रात दरवर्षी लाखोंच्या संख्येने सीगल म्हणजेच समुद्री ससाणा आणि फ्लेमिंगो उर्फ रोहित पक्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून स्थलांतर करतात.

या पक्षांचे मुख्य खाद्य आहे ते म्हणजे समुद्रातील मासे, खेकडे, अलगी इत्यादी. पण यांना मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, गेटवे ऑफ इंडिया या भागात हजारोच्या संख्येने येणारे पर्यटक बिस्किट, शेव, चिवडा, कुरमुरे, फरसाण, वेफर्स इत्यादी खाद्यपदार्थ खाण्यासाठी देतात. मुळामध्ये हे त्यांचं खाद्य नसून याच्या सेवनामुळे या पक्षांच्या पचनक्रियेवर आणि प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. यामुळे हे पक्षी त्यांच्या मूळ ठिकाणी गेल्यानंतर त्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागू शकते.

यामुळे कांदळवन कक्ष मुंबई यांच्यामार्फत परदेशी पक्षांना कोणतेही हानिकारक खाद्यपदार्थ देऊ नये. तसेच या पक्षांसोबत सेल्फी घेऊ नये, यासाठी पर्यटक आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. कांदळवन कक्षाचे कर्मचारी व महाराष्ट्र संरक्षण दलाचे जवान यांच्यामार्फत पहाटेच्यावेळी समुद्रकिनारी गस्त घालून ही मोहीम राबवण्यात येत आहे.