दुष्काळामुळे मराठवाडय़ातील स्थिती; टँकरवरच सारी भिस्त
लातूर नगर परिषदेच्या नळालाच जिथे पाणी नाही, तेथे आम्ही काय करणार.. शस्त्रक्रियेसाठी रुग्णांना दाखल केल्यास पाण्याची व्यवस्था कोठून करणार.. अगदी अत्यावश्यक शस्त्रक्रिया वगळता बहुतेक सर्व नियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नाही. लातूरच्या शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी मांडलेली ही व्यथा बहुतेक सर्वच दुष्काळी भागांत आहे. टँकरने पाणी आले की ते साठवून अत्यावश्यक शस्त्रक्रिया करायच्या आणि दिवस ढकलायचा ही अवस्था हिंगोली, परभणी, उस्मानाबाद, बीड आदी मराठवाडय़ातील बहुतेक दुष्काळी जिल्ह्य़ांत आहे. तरीही मिळेल तेथून शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून पाण्याचे टँकर मिळवून शासकीय डॉक्टर अत्यावश्यक शस्त्रक्रिया व उपचार प्रभावीपणे करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करत आहेत.
लातूर सर्कलमधील महिला रुग्णालय, जिल्हा रुग्णालयापासून ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत सर्वच ठिकाणी पाण्याची ओरड आहे. टँकरने कधी पाणीपुरवाठा होईल याचा कोणताच नेम नाही. नगर परिषदेचे नळ कोरडेठाक पडल्याने परिस्थिती बिकट झाली आहे. टँकरने आणलेल्या पाण्याचा वापर शस्त्रक्रियेसाठी करताना खूपच काळजी घ्यावी लागते. प्रामुख्याने बाळंतपणाच्या शस्त्रक्रियेसाठी जास्त पाणी लागते असे येथील डॉक्टरांनी सांगितले. शेतकरी आत्महत्याग्रस्त दुष्काळी चौदा जिल्ह्य़ांमध्ये पाण्याची अवस्था बिकट असली तरी कोणत्याही अत्यावश्यक शस्त्रक्रिया थांबलेल्या नाहीत. तातडीने उपचार करायची गरज असलेल्या सर्व रुग्णांना आम्ही दाखल करून घेत आहोत, असे राज्याचे आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार यांनी सांगितले.
तथापि लातूरसह काही जिल्ह्य़ांमध्ये पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असल्यामुळे पूर्वनियोजित शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नसल्याचे डॉ. पवार यांनी स्पष्ट केले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आरोग्य विभागाची बुधवारी महत्त्वपूर्ण बैठक
जूनपर्यंत पाण्याचे दुर्भिक्ष वाढत जाणार हे लक्षात घेऊन आरोग्य विभागाने अमरावती येथे २ मार्च रोजी चौदा दुष्काळी जिल्ह्य़ांतील वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. यात शेतकऱ्यांना आरोग्याचा खर्चाचा भार उचलावा लागू नये, अधिकाधिक महत्त्वाचे आजार राजीव गांधी जीवनदायी योजनेखाली आणणे आणि दुष्काळाच्या तडाख्यामुळे मद्यसेवनाकडे वळलेल्या निराश शेतकऱ्यांना समुपदेशन करणे आदी साऱ्यांचाच आढावा घेतला जाणार आहे असे आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार यांनी सांगितले.

* शासकीय रुग्णालयातील शस्त्रक्रियांवर परिणाम, अत्यावश्यक शस्त्रक्रिया वगळता नियमित शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या,
* २ मार्चला अमरावतीमध्ये आरोग्य अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक, टँकरच्या पाणीपुरवठय़ावर रुग्णालयाचे कामकाज अवलंबून
* विदर्भातील मुलांमध्ये जीवनसत्त्वाची कमतरता.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Doctors operation extend by water shortage in marathwada