मुंबई : राज्य सरकारच्या राजकीय बदनामीसाठी पोलिसांची बदनामी करू नका. त्याचा राज्यातील पोलिसांच्या मनोधैर्यावर परिणाम होतो. एखादा अधिकारी चुकला म्हणून संपूर्ण पोलिस दलाला जबाबदार धरता येणार नाही, असे स्पष्ट करत चांगले काम करणाऱ्या पोलिसांच्या पाठीशी उभा राहणार असल्याची ग्वाही गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील यांनी

दिली.

मागच्या दोन वर्षांत करोनाची परिस्थिती असताना सतत विविध राजकीय पक्षांची आंदोलने झाली. तसेच पोलिसांची आणि शासनाची प्रतिमा बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. परंतु पोलिसांकडून करोना कालावधीत झालेल्या उल्लेखनीय कामाकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे गृहमंत्री म्हणाले.

नवाब मलिक हे २०-२५ वर्षांपासून निवडून येत आहेत. त्यानंतर तुमची इतकी वर्षे सत्ता आहे. मग या काळात त्यांचे दाऊदशी संबंध असल्याचे का सापडले नाही. आताच कसे सापडले असा सवाल करत केंद्र सरकारच्या निर्णयांविरोधात ठाम भूमिका घेतल्यानेच मलिक यांच्यावर कारवाई झाल्याचा व त्यांची बदनामी सुरू असल्याचा दावा करत पुढील काळात मलिक यातून सुटतील, असा विश्वास वळसे-पाटील यांनी व्यक्त केला.