मुंबई : अमेरिकेने लागू केलेल्या नव्या आयात शुल्कामुळे भारतीय टपाल विभागाने अमेरिकेसाठी पार्सल सेवा तात्पुरती बंद केली आहे. तर, दुसरीकडे खासगी कंपन्यांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विशेष सवलती सुरु केल्या आहेत. असे असले तरीही ग्राहकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत परदेशात फराळ पाठविण्याच्या सेवेवर परिणाम झाल्याचे समोर आले आहे. तसेच, परदेशात फराळ पाठविणाऱ्या लोकांना पार्सल सेवेची मूळ किंमत वगळता ३० ते ४० डॉलर वाढीव रक्कम द्यावी लागत असल्याने अनेकांनी हात आखडता घेतला आहे. त्यामुळे परदेशात फराळ पोहोचवणारे छोटे गृहउद्योग, महिला स्वयंरोरोजगार गट आदींच्या व्यवसायाची आर्थिक घडी विस्कटली आहे.
सुख, समृद्धी, प्रकाश आणि चैतन्याचे प्रतीक असलेली दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून घरोघरी फराळ बनविण्याची लगबग सुरू झाली आहे. घरगुती फराळ बनविणाऱ्या व्यावसायिकांना या सणाची वर्षभर प्रतीक्षा असते. शिक्षण, नोकरी आणि उद्योगाच्या कारणांमुळे विदेशामध्ये स्थायिक झालेल्या भारतीयांना खमंग फराळाचा आस्वाद घेता यावा, यासाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात विदेशात दिवाळीच्या फराळाची निर्यात केली जाते. भारतीय टपाल विभागासह अन्य खासगी कंपन्यांमार्फत ही सेवा पुरवली जाते. परदेशातून येणाऱ्या ऑर्डर्समुळे त्यांच्या व्यवसायाला मोठा आर्थिक हातभार लागतो. मात्र, यंदा अमेरिकेने राष्ट्रीय सुरक्षा, व्यापार संतुलन राखण्यासाठी लागू केलेल्या आयात शुल्कामुळे दिवाळी फराळाच्या व्यवसायावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. यंदा परदेशातून विशेषतः अमेरिकेतून येणाऱ्या ऑर्डर्समध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे काही व्यावसायिकांचे म्हणणे आहे. अमेरिकेने लागू केलेल्या आयात शुल्कामुळे ऑर्डर्स घटल्याचे अंदाज वर्तविण्यात येत आहेत.
अमेरिकेसह अन्य पाच देशात पार्सल सेवा बंद
अमेरिकेत भेटवस्तू, कागदपत्रे, अन्य सामान पाठविण्याची प्रक्रिया महागडी व अवघड झाल्याने भारताने या देशात पार्सल सेवा बंद केली आहे. तसेच, कॅनडियन युनियन ऑफ पोस्टल वर्कर्सने सप्टेंबरपासून संप पुकारल्याने कॅनडा देशातही सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ, हॉलंड या देशांमध्ये टपाल सेवा बंद करण्यात करण्यात आली असून या देशांमध्ये काही पोहोचवायचे झाल्यास नागरिकांना खासगी कंपन्यांची मदत घ्यावी लागत आहे.
खासगी कंपनीकडून सवलती
डीएचएल आणि ब्लु डार्ट या कंपन्यांकडून दिवाळीनिमित्त परदेशात वस्तू पाठविण्यासाठी ६० टक्क्यांपर्यंत खास सवलत सुरु केली आहे. २७ ऑक्टोबरपर्यंत ही सवलत देण्यात आली आहे. मात्र, अद्याप नागरिकांकडून फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याचे कंपनीच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी सांगितले.
अमेरिकेत पार्सल पाठविण्यात अडचणी ; पालक हतबल
भारतातून पाठविलेले पार्सल परदेशातील प्राप्तकर्त्यांना मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. अनेकांना वेळेवर पार्सल मिळत नाही. अखेरीस ते तिथेच नष्ट केले जाते. त्यामुळे अमेरिकेत पार्सल पाठ्वण्यापूर्वी ग्राहकांना सावध केले जात आहे. गुरुवारी काही पालकांनी रडत याबाबत तक्रारी केल्यामुळे आता अमेरिकेत पाठवणाऱ्या ऑर्डर्स घेतल्या जात नसल्याचे एका कुरिअर कंपनीने कंपनीने स्पष्ट केले.
अमेरिकेतील सेवेसाठी ३० ते ४० डॉलर्सचा भार
काही कंपन्या स्वतःच्या जोखमीवर, ग्राहकांना विश्वासात घेऊन पार्सल सुरक्षितरित्या पोहोचवण्याचे आश्वासन देत आहेत. मात्र, त्यासाठी ग्राहकांकडून ३० ते ४० डॉलर्स अतिरिक्त शुल्क आकारले जात आहे. तसेच, कस्टम, डिकॅलेरेशन फॉर्म आदींसाठी अतिरिक्त पैसे भरावे लागत आहे. असे असतानाही अनेकजण आर्थिक भर सोसत पार्सल अमेरिकेत फराळ पाठविण्याची जोखीम घेत आहेत.
मागणीत ५० टक्के घट
यंदा दिवाळी फराळासाठी परदेशातून येणाऱ्या मागण्यांमध्ये जवळपास ५० टक्के घट झाल्याचे व्यावसायिका सुप्रिया वाघ यांनी सांगितले. गतवर्षी अमेरिका व अन्य देशातून १५ ते २० ऑर्डर्स आल्या होत्या. मात्र, यंदा केवळ ७ ते ८ ऑर्डर्स आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, अमेरिकेतील नेहमीच्या ४ ग्राहकांपैकी यंदा केवळ एकाने ऑर्डर दिली आहे. त्याव्यतिरिक्त मुंबईतून येणाऱ्या घरगुती फराळाच्या मागण्यांमध्ये काहीही परिणाम झाला नाही, असे राजन मेस्त्री यांनी सांगितले.