चार जणांकडून सव्वादोन किलो अमली पदार्थाचा साठा हस्तगत

ठाणे पोलिसांनी मोठय़ा प्रमाणात अमली पदार्थाचा जप्त करण्याची घटना ताजी असतानाच मुंबईतही खुलेआमपणे आलिशान पबमधून मेफ्रेडॉन (एमडी) हा अमली पदार्थ उपलब्ध असतो, अशी माहिती अमली पदार्थविरोधी पथकाने केलेल्या कारवाईमुळे उघड झाली आहे. घाटकोपर युनिटने अटक केलेल्या चौघांकडून ही माहिती पोलिसांना मिळाली आहे. मेफ्रेडॉनचा साठा प्रामुख्याने गुजरातमधून आल्याचेही स्पष्ट झाले आहे. संबंधित इसमाला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. त्यामुळे मुंबईतील अमली पदार्थ तस्करीचे दुवे मिळतील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त  केला आहे.

बिहारमध्ये ‘सिंघम’ म्हणून प्रसिद्ध असलेले शिवदीप लांडे हे सध्या प्रतिनियुक्तीवर मुंबई पोलिसांत दाखल झाले आहेत. त्यांच्याकडे अमली पदार्थविरोधी पथकाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. घाटकोपर युनिटचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप सावंत यांना श्रेयस सिनेमागृहावरून येणाऱ्या मारुती स्विफ्ट गाडीतून अमली पदार्थाची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सावंत यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक चारु चव्हाण, सानप, एकडे, हुंबे, दगडे, कांबळे आदींच्या पथकाने पाळत ठेवली होती. अखेरीस घाटकोपर बस आगारासमोर संबंधित गाडी आली असता काही संशयास्पद हालचाली आढळल्या. त्यामुळे या पथकाने छापा टाकून तपासणी केली असता गाडीत सुमारे एक किलो ६०० ग्रॅम एमडी या अमली पदार्थाचा साठा असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी चौघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्यांच्याकडे प्रत्येकी दोनशे ग्रॅम एमडी हा अमली पदार्थ सापडला. सनी ऊर्फ आसिफ गुलाम अन्सारी (२४), यतिन ललित संघवी (३९), सौमीव सुरेशचंद्र पाठक ऊर्फ सॅम (५१) आणि दलविंदर सिंग अजमेर सिंग ऊर्फ जग्गी (४७) अशी या चौघांची नावे आहेत. त्यांना अमली पदार्थ बाळगणे आणि तस्करीप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

तारकांनाही पुरवठा..

गुजरातमधून त्यांना हा साठा पुरविण्यात आल्याची माहिती चौकशीत उघड झाली आहे. संबंधित इसम पोलिसांच्या रडारवर असून या साठय़ामागील सूत्रधारांचा शोध घेतला जात असल्याचे वरिष्ठ निरीक्षक सावंत यांनी सांगितले. बॉलीवूडमध्येही काही तारकांना मेफ्रेडीन पुरविल्याची माहिती या आरोपींकडून मिळाली आहे. याबाबतही चौकशी केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.